---Advertisement---
भुसावळ : तालुक्यातील कु-हा गावाजवळ जामनेर रस्त्यावर सोमवारी पहाटे २:१५ वाजता एका कारच्या भीषण अपघातात चिंचोली लिंबाजी (ता.कन्नड, जि. संभाजीनगर) येथील सागर आबाराव श्रीखंडे (वय अंदाजे ३५) याचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आय 10 (MH-20 EJ-8195) ही कार भरधाव वेगात चालवताना चालक सागर श्रीखंडे याचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाली.अपघातात सागर श्रीखंडे याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सुनिल बाळाराम गोरे (फिर्यादी) व गणेश बाळाराम गोरे यांना तसेच दीपक हरी आढाव यांना दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 281, 106(1), 125(A), 125(B) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक विकास बाविस्कर हे करत आहेत.
स्थानिकांची अपघातग्रस्तांना मदत
अपघातग्रस्त वाहनाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून, स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करून रुग्णालयात पोहोचवले. हा अपघात वाहन चालवताना झालेल्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.