शिक्षक विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणार का विद्यार्थ्यांना शिकवणार?

पुणे : शिक्षकांवर लादण्यात येणार्‍या अशैक्षणिक कामांमुळे त्यांच्या ज्ञानदानाच्या कामावर विपरित परिणाम होत असतो. निवडणुकीच्या कामासह अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांवर करावी लागतात. त्यात आता विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड दुरुस्ती व अपडेटच्या कामाची भर पडली आहे. राज्य सरकारकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी केली जाणारी संचमान्यता ‘आधार नोंदणी’च्या आधारे होणार आहे. मात्र अजूनही १९ लाख विद्यार्थ्यांनी ‘आधार’ काढलेले नाही. ज्यांनी काढलेले आहे त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या कार्डामध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, अशा चुका आहेत. या चुका सुधारून ‘आधार’ अपडेट करण्याची जबाबदारी सरकारने शाळांवर टाकली आहे.

‘आधार’ नोंदणीच्या वेळी झालेल्या चुकांमुळे आता विद्यार्थ्यांच्या कार्डामध्ये दुरुस्ती करण्याची जबाबदारी सरकारने शाळांवर टाकल्याने ‘महा ई-सेवा’ केंद्रांवर शिक्षकांना सातत्याने जावे लागत आहे. शाळेत शिकवायचे की, ‘आधार’ नोंदणी करायची, असा प्रश्न शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी उपस्थित केला आहे. शिक्षकांच्या मते, ‘महा ई-सेवा’ केंद्रांवर आधार अपडेट करण्यासाठी संपूर्ण दिवस द्यावा लागतो. पालक त्यांच्या व्यस्ततेमुळे संपूर्ण दिवस थांबत नाहीत. यामुळे शाळेला नाइलाजाने हे काम करवून घ्यावे लागत आहे. त्यासाठी शिक्षकांचा वेळ जात असून, त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे.