दिल्ली महापालिकेवर ‘आम आदमी’ चा झेंडा; भाजपाची सत्ता संपुष्टात; काँग्रेसचे पानीपत

नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. एकूण २५० जागा असलेल्या एमसीडीमध्ये आम आदमी पक्षाने १३४ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाने १०४ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला केवळ ९ जागांवर विजय मिळाला. तर अपक्ष आणि इतरांच्या खात्यामध्ये केवळ ३ जागा गेल्या. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपाची दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे.

दिल्ली एमसीडीमध्ये २००७ पासून भाजपाची सत्ता होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने २७० पैकी १८१ जागा जिंकल्या होत्या. तर आपने ४८ आणि काँग्रेसने ३० जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीतील तीनही महानगरपालिकांचं एकत्रीकरण करून एकच महानगरपालिका स्थापन केली होती. सुरुवातीपासून ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात होती. दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ४२.५ टक्के मते मिळाली. तर त्याखालोखाल दुसर्‍या क्रमांकाची मते भाजपाला मिळाली. मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्णपणे पानीपत झाले नाही एवढीच भाजपासाठी जमेची बाजू ठरली.

आम आदमी पार्टीच्या या विजयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेशी संवाद साधत आभार मानले आहेत. केजरीवाल म्हणाले की, आता दिल्ली मला व्यवस्थित करायची आहे. त्यासाठी मला भाजपाची आणि काँग्रेसची देखील सहकार्य लागणार आहे. केंद्र सरकारचेही सहकार्य हवे आहे. दिल्ली सुरळीत करण्यासाठी मला पंतप्रधान आणि केंद्र सरकारचे आशीर्वाद हवे आहेत. यावेळी त्यांनी सर्व पक्षांच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदनही केजरीवाल यांनी केले. तसेच आता आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. हे राजकारण फक्त आजपर्यंत होते, असे आवाहनही सर्व पक्षांच्या उमेदवारांना केलं.