दिल्ली दिनांक
– रवींद्र दाणी
AAP Government : तिहार कारागृहात असलेले आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी कारागृहात असताना आपल्याला ‘विपश्यना’ कक्षात ठेवण्यात यावे तसेच आपल्याला भगवद्गीतेची प्रत जवळ ठेवण्याची परवानगी मिळावी अशी विनंती न्यायालयास केली होती. सिसोदिया यांना भगवद्गीतेची आठवण अगोदरच झाली असती व त्यानुसार त्यांनी आपले आचरण ठेवले असते तर त्यांच्यावर कारागृहात जाण्याची वेळच आली नसती.
सिसोदियांप्रमाणेच त्यांचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अचानक ध्यानधारणेचे वेध लागले आहेत. होळीच्या दिवशी आपण दिवसभर ‘ध्यानधारणा’ करणार आहोत. त्यामुळे कुणालाही भेटू शकणार नाही अशी घोषणा त्यांनी केली होती. केजरीवाल यांना या काळात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असते तर ते खरोखरीच ध्यानधारणा करीत आहेत की घरी बसून वेगवेगळे सौदे करीत आहेत हे समोर आले असते. सिसोदिया असोत की केजरीवाल दोघांनाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने किती मोठा तडाखा दिला आहे याचा सज्जड पुरावा म्हणजे दोघांनाही अचानक सुचलेली ध्यानधारणा!
समस्या वाढणार
सिसोदिया यांच्या जमानत याचिकेवर आज 20 तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे. सिसोदिया यांना प्रथम सीबीआयने अटक केली. आता त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. याने त्यांच्या समस्या वाढणार आहेत. ‘आप’ने सिसोदिया यांच्या अटकेला राजकीय अटक सांगितले असले तरी, दिल्ली सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे या पक्षात मानले जात आहे. त्यातही सिसोदिया यांच्याबाबत तर कुणालाही सहानुभूती नाही. मात्र, या ठिकाणी प्रश्न केवळ सिसोदियांचा नाही. दिल्ली सरकारमध्ये भ्रष्टाचार होत आहे, त्याची सारी जबाबदारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर आहे. मात्र, केजरीवाल कुणाचेही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात असे त्यांच्या सहकार्यांना वाटते. केजरीवाल यांना त्यांच्या पक्षातच एक हुकूमशाही व सनकी नेता मानले जाते.
मुद्दा भ्रष्टाचाराचा
दिल्लीत शीला दीक्षित सरकारच्या विरोधात आंदोलन करून सत्तेवर आलेल्या केजरीवाल यांना आता भ‘ष्टाचाराच्या विळ‘याने वेढले आहे. दिल्ली आणि पंजाबातही! दिल्लीत प्रत्येक सरकारी कंत्राटाची- कामाची टक्केवारी ठरली आहे. ही टक्केवारी देणार्यालाच सरकारी कामाचे कंत्राट दिले जाते. आम आदमी पक्षात याची जोरदार चर्चा होत आहे. याचाच परिणाम म्हणजे केजरीवाल यांनी सिसोदिया यांना राजीनामा देण्यास सांगितले. दिल्ली सरकारचे आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन यांच्या बाबतीत हे झाले नव्हते. जैन यांना अटक झाल्यावरही त्यांनी राजीनामा दिला नव्हता. मग हेच धोरण सिसोदिया यांच्या बाबतीत का लागू करण्यात आले नाही? कारण, केजरीवाल बाहेर काहीही सांगत असले तरी आम आदमी पक्षात सिसोदिया यांना एक भ्रष्ट नेता मानले जाते. सीबीआयच्या अटकेने त्यावर फक्त शिक्कामोर्तब झाले आणि भ्रष्टाचाराचे बिंग फुटले. त्याने हादरलेल्या केजरीवाल यांनी फार खळखळ न करता सिसोदिया यांचा राजीनामा घेतला.
थंड प्रतिसाद
सिसोदिया यांच्या अटकेविरोधात ‘आप’ने जोरदार आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्याचा कोणताही परिणाम दिल्लीत दिसला नाही. कारण, पक्ष कार्यकर्त्यांनाही सिसोदिया यांच्या भ्रष्टाचाराची सुगबुग लागली होती. अगदी फिल्मी शैलीत गोपनीयता बाळगत पैशाचे सौदे व वसुली होत असली तरी या बाबी लपून राहत नसतात. याने केजरीवाल यांच्या आंदोलनाचा फज्जा उडाला.
भक्कम पुरावा
सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या विरोधात भक्कम पुरावा गोळा केला असल्याचे समजते. सिसोदिया यांच्या गळ्याभोवती फास आवळला गेल्यास, ते केजरीवाल यांचे नाव समोर करतील. या सार्या घटनाक्रमाने आम आदमी पक्ष व केजरीवाल यांच्या स्वच्छ प्रतिमेचा दावा फोल ठरला आहे. यात भर म्हणजे सध्या कारागृहात असलेला सुकेशकुमार नावाचा एक ठग नवी नवी पत्रे लिहीत केजरीवाल व आपच्या काही नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करीत आहे. कोट्यवधी रुपयांची रक्कम आपण आपच्या नेत्यांना केव्हा दिली, कुठे दिली याचा सारा तपशीलच सुकेशने सांगितला आहे. हेही प्रकरण केजरीवाल यांच्यासाठी स्फोटक ठरणार आहे.
क‘मांक दोन कोण?
केजरीवाल यांनी सुश्री आतिषी व सौरभ भारद्वाज यांना नवे मंत्री केले आहे. त्यांना कामाचे वाटप केले जाईल. पण, सिसोदिया यांच्या जागी क्रमांक दोन कोण हा प्रश्न केजरीवाल यांना सतावणार आहे. 2011 मध्ये अण्णा आंदोलनानंतर आम आदमी पक्ष स्थापन झाला. त्यानंतर हळूहळू केजरीवाल यांचे अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. कुणाशीही त्यांचे पटले नाही. मात्र सिसोदियांशी त्यांचे कधी फाटले नाही. आता सिसोदियांविरुद्धचे प्रकरण बरेच काळ चालणार आहे. सिसोदियांचा सरकारमध्ये येण्याचा मार्ग काही काळासाठी तरी बंद झाला आहे. अशा स्थितीत केजरीवाल- सरकार व संघटना यात कुणाशी बोलून निर्णय घेणार हा प्रश्न तयार झाला आहे. सिसोदियाची ही पोकळी भरून काढणे केजरीवाल यांना बरेच जड जाणार आहे.
गत ममतासारखी!
राजकीय विचार करता केजरीवाल यांची गत आता ममता बॅनर्जींसारखी होत आहे. एका भ्रष्टाचार प्रकरणात ममता बॅनर्जींचे एक मंत्री अडकल्यानंतर त्यांचा आवाज एकदम बंद झाला. पंतप्रधान होण्याचे त्यांचे स्वप्न जणू धुळीस मिळाले. सरकारमधील एक मंत्री काही कोटी रुपये जमा करतो आणि याची कल्पना मुख्यमंत्र्यांना नाही हे स्वीकारता येणार नाही. सध्या तुरुंगात असलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी जो पैसा गोळा केला, तो ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून गोळा केला हे स्पष्ट आहे. त्या प्रकरणात ममता बॅनर्जींचे हात अडकले असल्याने त्या फार बोलू शकत नाहीत.
पहिला पराभव
याचा राजकीय परिणाम राज्यात नुकत्याच झालेल्या सागरदिघी या विधानसभा पोटनिवडणुकीत पाहावयास मिळाला. याठिकाणी काँग्रेस उमेदवार 22 हजार मतांनी विजयी झाला. ही जागा तृणमूल काँग्रेसकडे होती. स्वत: ममता बॅनर्जींनी प्रचार करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एक मोठा जनाधार त्यांच्या पक्षाकडून काँग्रेसकडे जात असल्याचे मानले जाते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसेल आणि त्यांच्या काही जागा काँग्रेसला मिळतील असाही अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. जेव्हा मतांची व्होटबँक सरकते तेव्हा ती एका मतदारसंघात सरकत नाही, तर त्या राज्यात सर्वत्र त्याचा प्रभाव दिसतो. त्यामुळे सागरदिघीचा निकाल केवळ एका मतदारसंघाचा नाही तर येणार्या काळात राज्यात दिसणार्या नव्या राजकीय चित्राची ती झलक आहे असे मानले जात आहे.
पंतप्रधानपदाची आकांक्षा
केजरीवाल यांच्यात पंतप्रधान होण्याची जबरदस्त आकांक्षा आहे. मागील 8-9 वर्षांपासून ते सत्तेत आहेत. मात्र त्यांना लोकसभेची एक जागा जिंकता आलेली नाही. राज्यसभेतही त्यांनी एक दोन अपवाद वगळता पैसेवाल्यांना पाठविले. आता तर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करावा लागत आहे. याने बंगालची पुनरावृत्ती दिल्लीत होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या दिल्ली मनपा निवडणुकीत आम आदमी पक्षाला काठावर विजय मिळाला. 2015 व 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने अभूतपूर्व विजय मिळविला होता. ती लाट आता ओसरू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत याची जाणीव केजरीवाल यांना निश्चितच होईल.