मुंबई – राज्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज पार पडले. यामध्ये शिवसेनेकडे असलेली काही खाती अजित पवार गटाला देण्यात आली. त्यामुळे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी यावर प्रतिक्रिया आली आहे.
काय म्हणाले सत्तार?
अपेक्षेप्रमाणे नागपूरच्या अधिवेशनात सन्मानीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खाते बदलून देण्याची विनंती केली होती. धनंजय मुंडे माझ्यापेक्षा चांगलं काम करतील, असा विश्वास व्यक्त करतानाच अल्पसंख्यांक खात्यातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.
सत्तार यांनी त्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या योजनांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, माझी एक इच्छा होती की, शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा उपलब्ध करून द्यावा, ती मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली. पीएम किसान योजना आणि राज्याने सहा हजार द्यावे, ती योजना आणि राशन कार्डबाबतच्या योजनेची अंमलबजावनी झाली. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कंपनीच्या माध्यमातून राबविली जात होती. ती योजना मी कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली.
अनेक कार्यक्रम माझ्या कार्यकाळात पार पडले. माझ्या प्रयत्नांना सर्व मंत्र्यांनी मदत केली. शेतकऱ्यांच्या भावना माझ्या कामाशी जोडल्या आहेत. नोकरभरतीचं कामही प्रगतीपथावर सुरू आहे. सरकारने अत्यंत वेगाने काम केल्याचही त्यांनी नमूद केलं.