अभिनंदन योगी आदित्यनाथांच्या पोलिसांचे!

अग्रलेख 

राज्यकर्त्यांमध्ये हिंमत आणि धडाडी असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ते काय चमत्कार करू शकतात, हे उत्तरप्रदेशातील ताज्या चकमकीच्या घटनेवरून दिसून आले. बसपा आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार अ‍ॅड. उमेश पाल आणि त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांच्या दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या हत्याकांडातील दोन आरोपी झाशीजवळ झालेल्या पोलिस चकमकीत मारले गेले. त्यातील एक आरोपी असद अहमद हा उत्तरप्रदेशातील कुख्यात आरोपी अतिक अहमदचा मुलगा होता. त्याच्यासोबत शार्पशूटर गुलाम मोहम्मदही या चकमकीत ठार झाला. बाप तसा बेटा वा खाण तशी माती, असे म्हटले जाते. अतिक अहमद हा उत्तरप्रदेशातील कुख्यात डॉन आहे. अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे. उमेश पाल हत्या प्रकरणातही अतिक अहमदचा हात आहे. तुरुंगातूनच अतिक अहमदने उमेश पालच्या हत्येचे कारस्थान रचले आणि ते प्रत्यक्षात आणले. अतिकचे संपूर्ण घराणेच गुन्हेगारी घराणे आहे, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. कारण या हत्याकांडात त्याच्या घराण्यातील सर्वांचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे.

अतिक अहमद हा नुसता गुन्हेगारच नाही तर राजकारणीही आहे. कधीकाळी सपा आणि बसपातर्फे तो खासदार राहिला होता. राजकारणी आणि गुन्हेगार यांची हातमिळवणी असल्याचा आरोप आपल्याकडे खूप जुना आहे. अनेक राजकीय पक्षांनी गुन्हेगारांना आपल्या पक्षात प्रवेश आणि निवडणुकीत उमेदवारीही दिली. या गुन्हेगारांचा उपयोग राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी केला तर गुन्हेगारांनी या पक्षांचा उपयोग आपल्या गुन्हेगारीचा विस्तार करण्यासाठी केला. या आरोपाला अतिक अहमदच्या ताज्या घटनाक्रमाने बळ मिळते. बिहार आणि उत्तरप्रदेशसारख्या राज्यात गुन्हेगार आणि राजकारणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. यातूनच राजकारणी माणसाला निवडून येण्यासाठी मदत करण्यापेक्षा आपणच का निवडून येऊ नये, लोकप्रतिनिधी होऊ नये, असे गुन्हेगारांना वाटू लागले आणि राजकीय पक्षांनीही आपल्या फायद्यासाठी त्यांना उमेदवारी देणे सुरू केले. यातूनच अतिक अहमद असो की आजम खान यांना राजकीय प्रतिष्ठा मिळाली. अशा कुख्यात गुन्हेगारांना निवडून देण्यासाठी काही प्रमाणात मतदारांनाही दोषी मानायला हरकत नाही. यातूनच आपल्या देशात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आणि गुन्हेगारीचे राजकीयीकरण झाले. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत व्होरा समितीचा एक अहवाल आहे. पण हा अहवाल प्रसिद्ध करण्याची हिंमत तेव्हाच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांनी दाखवली नाही. कारण हा अहवाल त्यांच्या मुळावर येणार होता. यात काँग्रेसचेच अनेक नेते अडकले होते.

प्रयागराज आणि पूर्वांचल भागात अतिक अहमदची जबरदस्त दहशत होती. खंडणी, अपहरण, हत्या अशा अनेक गुन्ह्यांत त्याचा सहभाग होता. प्रयागराज येथील न्यायालयात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अजीम ऊर्फ अशरफ यांना उभे करण्यासाठी आणले असता अतिकला आपला मुलगा असद पोलिस चकमकीत मारला गेल्याची माहिती मिळाली आणि तो ढसाढसा रडायला लागला. रडणारा अतिक हा त्यावेळी डॉन नव्हता, तर एका मुलाचा बाप होता. मुलाच्या मृत्यूचे दु:ख काय असते, याची त्याला जाणीव झाली. याआधी त्याने कित्येक निरपराध मुलांची हत्या केली, तेव्हा त्यांचेही आईबाप असेच ढसाढसा रडले असतील. त्यावेळी अतिकला वाईट वाटले नाही. मारल्या गेलेल्या त्या निरपराध मुलांच्या आईबापांच्या अश्रूंची किंमत अतिकला यावेळी चुकवावी लागली, असे म्हणणे चुकीचे ठरू नये. त्याचप्रमाणे आपल्या मुलाच्या मृत्यूलाही अतिक अहमदच जबाबदार आहे, असेही म्हटले तर ते वावगे होणार नाही. त्याने लहानपणापासून आपल्या मुलावर गुन्हेगारीचे संस्कार केले नसते, तर त्याचा मुलगा वाईट मार्गाला लागला नसता आणि त्याच्यावर असे मरण ओढवले नसते. मात्र, संस्कारहीन आणि भरकटलेला अतिक आपल्या मुलावर चांगले संस्कार तरी कसले करणार?

असद अहमदच्या चकमकीनंतर सपाचे अखिलेश यादव, बसपाच्या मायावती आणि एआयएमआयएमचे असदुद्दिन ओवैसी यांनी गळे काढले आहेत. ही चकमक बनावट असून त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. खरं म्हणजे अतिक अहमद असो की आजम खान त्यांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून देणारे खरे गुन्हेगार अखिलेश यादव आणि मायावती हेच आहेत. ओवैसी यांनी नेहमीप्रमाणे या वादाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम असल्यामुळे असद अहमद पोलिस चकमकीत मारला गेल्याचा हास्यास्पद आरोप त्यांनी केला. पण याआधी हिंदू असलेला कुख्यात गुन्हेगार विकास दुबेही पोलिस चकमकीत मारला गेला होता, हे ओवैसी कसे विसरले? असदच्या चकमकीच्या दोन दिवस आधी राणा नावाचा आणखी एक गुन्हेगार चकमकीत मारला गेला. गुन्हेगाराला कोणताच धर्म नसतो. गुन्हेगारी हाच त्याचा धर्म असतो. त्यामुळे हा आमच्या धर्माचा गुन्हेगार तर तो तुमच्या धर्माचा गुन्हेगार असा भेद कोणी करू नये. गुन्हेगाराकडे फक्त गुन्हेगार म्हणूनच पाहिले पाहिजे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उमेश पालच्या हत्येनंतर गुन्हेगारांना मातीत मिळवण्याचा इशारा दिला होता; तो त्यांनी प्रत्यक्षात आणला, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. योगींनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यापासून गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली. कायद्याचे राज्य म्हणून उत्तरप्रदेशला नवी ओळख दिली. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यायला लागली. याचाच अर्थ देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांचा योगींच्या नेतृत्वावर विश्वास बसला आहे. याआधी अखिलेश यादव आणि मायावती यांच्या कार्यकाळात उत्तरप्रदेशात गुंडागर्दी वाढली होती. उमेश पालची आई शांती पाल आणि पत्नी जया पाल यांनी असदच्या चकमकीच्या घटनेवर समाधान व्यक्त करताना ‘देर है अंधेर नही’ अशी प्रतिक्रिया दिली; ती राज्यातील सर्वसामान्य जनतेची भावना म्हटली पाहिजे. या दोघींनी ‘भगवान के घर’ असे शब्द उच्चारले नसले, तरी योगी आदित्यनाथ त्यांच्यासाठी कोणत्याही ‘भगवान’पेक्षा कमी नाहीत.

योगींच्या कार्यकाळात राज्यात आतापर्यंत हजारांवर चकमकी झाल्या. यात शेकडो गुंड मारले गेले. सर्वसामान्य जनता अशा चकमकींचे स्वागतच करीत असते. काही वेळा पोलिस चकमकी या आवश्यक ठरत असल्या, तरी तो गुन्हेगारी नियंत्रणाचा शेवटचा आणि नाईलाजाने वापरावा लागणारा मार्ग आहे, याचे भान उत्तरप्रदेशातीलच नाही तर सर्वच राज्यांतील पोलिसांनी ठेवले पाहिजे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे अन्य अनेक मार्ग आहेत; त्या मार्गांचाही अवलंब केला पाहिजे. सामान्यपणे आपल्या देशात कोणत्याही चकमकीची उच्चस्तरीय चौकशी होते, तशी ती या चकमकीची होऊ शकते. कारण गुन्हेगारांना शिक्षा करण्याचे काम हे पोलिसांचे नाही तर न्यायालयांचे आहे. पोलिसांनी न्यायालयांचे काम आपल्याकडे घेऊ नये, ते न्यायालयांकडेच राहू द्यावे. न्यायालयाने गुन्हेगारांना दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस आणि प्रशासनाचे आहे. असद अहमदच्या चकमकीचे स्वागत करताना तसेच त्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ आणि उत्तरप्रदेश पोलिसांचे अभिनंदन करताना गुन्हेगारी निर्मूलनाचा हा स्थायी नाही तर आपात्कालीन मार्ग आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे, असे म्हणावेसे वाटते.