Abu Azmi on Aurangzeb : मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, सोमवारपासून मुंबईत सुरू झालंय. मात्र, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना औरंगजेबचा पुळका आल्याचे पाहायला मिळाले. अर्थात अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असे वादग्रस्त वक्तव्य केले. आता या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद पाहायला मिळत आहे.
नेमकं काय म्हणाले अबू आझमी?
औरंगजेबाचा इतिहास चुकीचा दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची स्थापना केली, औरंगजेबाचा सैनिक हा बनारसमधल्या एका तरुणीशी बळजबरी करत होता, तिला लग्न करण्याची जबरदस्ती करत होता. तेव्हा औरंगजेबाने दोन हत्तींमध्ये बांधून त्या सैनिकाची हत्या केली. तेथील पंडितांनी औरंगजेबासाठी मस्जिद बांधून दिली, असे अबू आझमी यांनी सांगितले.
तसेच अबू आझमी यांना तुम्ही औरंगजेबाला क्रूर शासक मानता का?’ असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही, औरंगजेब हा उत्तम शासक होता. तेव्हाची लढाई राजकीय होती. तेव्हाची लढाई हिंदू-मुसलमान अशी लढाई नव्हती’ असं अबू आझमी यांनी म्हटलंय.
दरम्यान, आता या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद पाहायला मिळत असून, आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘अबू आझमी यांनी हे वक्तव्य सुपारी घेऊन करत आहेत. ते वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात वादाची ठिणगी करायचा प्रयत्न करत आहेत. यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीय. आता यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.