मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणं ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना चांगलेच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्यामुळे दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दत्ता दळवी यांना त्यांच्या विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दत्ता दळवी यांना अटक झाल्याची माहिती मिळताच भांडूप पोलीस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, दत्ता दळवींच्या अटकेसंदर्भात जाब विचारण्यासाठी खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत भांडुप पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाणार आहे.
दत्ता दळवी यांच्या अटकेप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, “मुंबईचे माजी महापौर, शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना घरात घुसून अटक केली. एखाद्या ३०२, ३०७ गुन्ह्यासारखे आरोपी कुठे पळून जाणार आहे अशाप्रकारे पोलिसांचा फौजफाटा घेऊन अटक केली. दळवी यांचा गुन्हा काय तर त्यांनी लोकांच्या जनभावना भांडुपच्या मेळाव्यात व्यक्त केल्या. जे गद्दारहृदयसम्राट आहेत, ते स्वत:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेतायेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.