अभाविप : भारतीयत्वाला समर्पित विद्यार्थी चळवळीचे ७५वे वर्ष

भारतीयत्वाच्या उदात्त विचाराला वाहिलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ऐतिहासिक संघटनात्मक प्रवास दि. ९ जुलै रोजी ७५व्या वर्षात पदार्पण झाला. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच…

 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय पुनर्निर्माण आणि सक्षम आणि सशक्त तरुण पिढी घडवण्याच्या उदात्त ध्येयाने दि. ९ जुलै १९४९ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रवास सुरू झाला. कोणत्याही संघटनेसाठी ७५व्या वर्षापर्यंत पोहोचणे ही एक अभिमानास्पद, महत्त्वाची आणि उत्सवाची घटना. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक प्रवासात ही घटना अशा वेळी आली आहे, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी पर्व सुरू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा प्रवास देशाच्या विकासा सोबतच देशासाठी समर्पित सक्षम तरुण पिढी घडवण्याचा आहे.

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे स्वरूप ७५व्या वर्षात व्यापक आणि बहुआयामी झाले. मागील वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एकूण सदस्यता ४५ लाखांहून अधिक झाली असून, देशभरात २१ हजारांहून अधिक ठिकाणी अभाविपच्या शाखा व संपर्क केंद्र आहेत. हा केवळ आकडा नसून, विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय चारित्र्य स्पष्टपणे समोर आणून ती जागतिक स्तरावरील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असल्याचे सिद्ध करते. गेली ७४ वर्षे शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर कार्यरत असलेल्या अभाविपच्या सकारात्मक शक्तीने भारतीय शैक्षणिक परिसरांमधून राजकारण, चित्रपट, मीडिया, व्यवसाय, शिक्षण, प्रशासन आदी क्षेत्रांना प्रभावी युवा नेतृत्व दिले आहे. आज या वैविध्यपूर्ण क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती आहेत, जे विद्यार्थी जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सक्रियपणे जोडलेले आहेत.

 

देशातील आणीबाणीसारख्या मोठ्या संकटाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची महत्त्वाची भूमिका आणि योगदानासोबतच लहान-मोठ्या प्रमाणात अशी अनेक उदाहरण आहेत, जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली देशातील तरुणांनी सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री राहिलेले आणि सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख असलेले सुनील आंबेकर अभाविपच्या संकल्पानिमित्त लिहितात की, ‘भारत ही आमची माता आहे, आम्ही पुत्राप्रमाणे देशवासीयांची सेवा करू, या संकल्पासोबत विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली होती. विद्यार्थी परिषदेचे कार्यक्षेत्र जरी शैक्षणिक परिसर म्हणजेच कॅम्पस असले, तरी वैचारिक क्षेत्र हे शिक्षणाच्या पलीकडे जाऊन देशहिताच्या प्रत्येक मुद्द्याशी निगडित आहे.’

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रवास हा भारतीय मूल्यांनी प्रेरित देशभक्त तरुणांची सक्षम पिढी घडवण्याचा प्रवास राहिला आहे. कोरोना महामारीच्या काळात, देशावर संकट आले असताना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी लोकांचे दुःख कमी करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. हे ताजे उदाहरण आहे, असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा अभाविपच्या नेतृत्वाखाली तरुणांनी एकत्र येऊन देशातील विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम पुढे आला. देशातील शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची हितचिंतक म्हणून आपली भूमिका बजावत आहे. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध शाखा पर्यावरण, सेवा, क्रीडा इत्यादी क्षेत्रातही कार्यरत आहेत.

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपला प्रवास सतत नवनवीन विषय आणि क्षेत्रांशी जोडून ठेवला आहे, त्यामुळेच ७५व्या वर्षात पोहोचलेला हा प्रवास कुठेही खडतर किंवा स्तब्ध न राहता सतत गतिमान आणि नव्या क्षेत्रांमध्ये गुंतलेला दिसतो. एकीकडे उर्वरित विद्यार्थी संघटना मर्यादित क्षेत्रात एकाकी आंदोलनापुरत्या मर्यादित असताना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रवास केवळ आंदोलनांपुरता मर्यादित न राहता, शिस्तबद्ध सर्जनशीलतेच्या माध्यमातून तरुणांना जगाशी संबंधित विविध विषयांशी जोडणारा आणि भारतीय मूल्यांशी जोडून सतत गतिमान राहणे व अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणादायी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा शिस्तबद्ध, भारतीय-केंद्रित विचार मार्गावर गतिमानतेचा प्रवास असाच प्रवाहित राहील, जेणेकरून येणार्‍या पिढ्यांना नवीन आव्हानांना तोंड देता येईल आणि राष्ट्र पुनर्निर्माणाचे स्वप्न पूर्ण करता येईल व सक्षम नागरिक म्हणून भारतीय तरुण प्रत्येक क्षेत्रात जागतिक नेतृत्वाची भूमिका बजावू शकतील.

 

सर्व देशवासीयांना राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आशुतोष सिंह

 

(लेखक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मीडिया संयोजक आहेत.)