तरुण भारत लाईव्ह । पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गुरुवार २५ मे ते रविवार २८ मे दरम्यान ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’, पुणे येथे होणार आहे. विद्यापीठांची स्थिती सुधारणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी, परीक्षांचे पारदर्शक आयोजन आणि तरुणांशी संबंधित समकालीन विषय या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असून संवादातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आगामी वर्षाची भूमिका व कृती आराखडा ठरवेल.
अभाविप च्या संघटनात्मक दृष्टिकोनातून, ४४ प्रांतातील एकूण ४६७ प्रतिनिधी आणि प्राज्ञिक विद्यार्थी परिषद, मित्र राष्ट्र नेपाळची विद्यार्थी संघटना राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल आणि राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांच्या हस्ते २५ मे रोजी संध्याकाळी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्घाटन होणार असून, २६ मे ला सायंकाळी ०६ वाजता जनरल मनोज एम. नरवणे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत नागरिक अभिनंदन समारोह चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजशरण शाही आणि अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देशातील सर्व राज्यातील प्रमुख प्रतिनिधी सहभागी होत आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात प्रभावी काम करण्याबरोबरच पर्यावरण, सेवा आदी महत्त्वाच्या विषयांमध्ये तरुणांचा सहभाग घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम अभाविप करत आहे. २५ मे रोजी अभाविपचे आयाम, कार्य तसेच गतिविधी प्रमुख व मुख्य कार्यकर्त्यांची बैठक होईल. ज्यामध्ये पर्यावरण, सेवा, शालेय शिक्षण, क्रीडा इत्यादी विषयांमध्ये तरुणांच्या सहभागावर अभाविपची भविष्यातील कृती आराखडा तयार केला जाईल.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, “सध्याच्या घडीला शिक्षण क्षेत्रातील बदल सकारात्मक दिशेने होण्यासाठी सर्व संबंधितांनी एकत्र येण्याची गरज आहे. आज संगणकावर आधारित पारदर्शकतेचा मुद्दा समोर आला आहे. परीक्षा, एनआरएफच्या निर्मितीला होणारा विलंब, विविध शैक्षणिक संस्थांमधील फी वाढ, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना, आदी समस्यांचा फटका तरुणांना बसत आहे. या मुद्द्यांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे की ही स्थिती सुधारण्यासाठी तात्काळ जबाबदार पावले उचलावीत. विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक संवाद होणार असून, या बैठकीत ठरविल्या जाणाऱ्या दिशेने देशात सकारात्मक बदल घडवण्यासाठी देशभरातील अभाविप शाखा काम करतील.