नंदुरबार : वाळूचा ट्रक सोडण्यासाठी एक लाखांची लाच मागून तडजोडीअंती 70 हजारांची लाच स्वीकारणार्या रनाळा तलाठी प्रशांत नीळकंठ देवरे (42) यांना धुळे एसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नंदुरबार तहसील कार्यालयाच्या गेटसमोर पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, देवरे यांना मंगळवारी नंदुरबार न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तहसील कार्यालय आवारात स्वीकारली लाच
गौण खनिजाची व्यवसाय करणार्या तक्रारदार यांचा वाळू वाहतूक करणारा ट्रक नंदुरबार शहरातील करण चौफुली येथे संशयित तलाठी देवरे यांनी अडवून मंगळवार, 21 रोजी जप्त केला होता. हा ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात सुरूवातीला एक लाख व तडजोडीअंती 70 हजारांची लाच पहिल्या हप्त्यापोटी सोमवारी स्वीकारण्याची तयारी तलाठी यांनी दर्शवल्यानंतर धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली व रात्री सापळा रचण्यात आला. नंदुरबार तहसीलच्या गेटवर आरोपीने 70 हजारांची लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात रात्री उशिरा नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात निरीक्षक् मंजितसिंग चव्हाण, निरीक्षक प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने यशस्वी केला.