बेळगाव : डंपर व मोटारीच्या धडकेत मोटारीला आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेदहा वाजता बंबरगा (ता. बेळगाव) येथे घडली आहे. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बेळगावातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात मोहन मारुती बेळगावकर (वय २६) व समीक्षा सागर डोळेकर (वय १२) या दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत समीक्षा ही मूळची बेळगाव तालुक्यातील मच्छे गावची रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मृत मोहन हा बंबरगा गावचा रहिवासी आहे.
या अपघातात महेश बेळगावकर व स्नेहा बेळगुंदकर हे दोघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी बंबरगा येथे धाव घेतली. अपघातानंतर डंपरचालक फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त मोटारी कंग्राळी येथून बंबरगा गावाकडे निघाली होती. तर डंपर केदनूर येथून माती भरून भूतरामट्टी गावाकडे निघाला होता. दोन वाहनांची धडक झाल्यानंतर डिझेल टाकी फुटली व दोन्ही वाहनांना आग लागली. त्या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला.
धडक बसल्यानंतर दोघेजण मोटारीमधून बाहेर फेकले गेले, ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर बंबरगा ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. जखमींना तातडीने उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले. मातीची वाहतूक करणारे डंपर बंबरगा परिसरात बेदरकारपणे चालविले जात आहेत, त्याबद्दल परिसरातील नागरिकांकांडून सातत्याने तक्रारी होत होत्या, पण बुधवारी त्यातील एका डंपरने दोन निष्पापांचा बळी घेतला आहे
नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोटारीमधील चौघेजण कंग्राळी येथे लग्न समारंभ माघारी बंबरगा येथे जात होते, पण घरी पोचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दोघांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत मोटारीसह डंपरही ही जळाला आहे. काकती पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. काकती पोलिस पुढील तपास करीत आहेत.