समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

तरुण भारत लाईव्ह न्युज : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना आज १ जुलैला पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.

 

प्राप्त माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी बसमध्ये 33 प्रवासी होते. त्यामधील २५ प्रवासी झोपेतच मृत्यूमुखी पडले तर अन्य ८ प्रवासी अपघातातून प्राण वाचवण्यात यशस्वी ठरले.

 

ही खासगी बस (एमएच २९ बीई १८१९) समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. दरम्यान, बुलढाण्यातील सिंदखेड राजा जवळ बसचं टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर जावून ती एका खांबाला जाऊन धडकली. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली.

 

या धडकेत बसच्या डिझेल टँकवर आघात होऊन ते फुटलं. आणि ठिणग्याही उडाल्याने बसने पेट घेतला. या आगीतच बहुतांश प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अपघातात वाचलेल्या प्रवाशांनी बसच्या काचा फोडून कसाबसे बसच्या बाहेर पडत आपले प्राण वाचविले, अशी माहिती कडासने यांनी दिली.

 

जखमी प्रवाशांवर बुलढाण्यातील रुग्णालयातच उपचार करण्यात येत आहेत, या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटवता आलेली नाही. याबाबत तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे असंही पोलिसांनी माहिती दिली.

 

अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये बसचा कोळसा झाल्याचं भीषण दृश्य फोटोंमधून पाहू शकतात.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमनच्या बंबाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील कार्यवाही प्रशासनाकडून सुरू आहे.

 

बुलढाणा बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

बुलढाणा बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.