मोठी बातमी ! अपघात ग्रस्तांना मिळणार ‘कॅशलेस ट्रीटमेंट’; गडकरींचा निर्णय

‘Cashless Treatment’ Scheme : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार जखमींच्या उपचाराचा खर्च 1.5 लाख रुपयांपर्यंत उचलणार आहे. अपघात झाल्यानंतर सात दिवसांच्या आत उपचार घेतल्यास, सरकार हा खर्च पूर्णपणे करेल. ही योजना मार्च 2025 पर्यंत अंमलात आणण्याचे लक्ष्य आहे.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ प्रत्येक रस्ते अपघातासाठी मिळेल, आणि अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना माहिती देण्यात आली पाहिजे. तसेच, हिट अँड रन प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय आरोग्य प्रशासन (NHA), पोलिस, रुग्णालये आणि राज्य आरोग्य संस्थांच्या समन्वयाने केली जाईल. रस्ते अपघातांची माहिती त्वरित पोलीस आणि रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ई-तपशीलवार अपघात अहवाल’ (eDAR) ऍप्लिकेशन आणि NHA च्या प्रणालीचा समन्वय केला जाईल.

गडकरी यांनी रस्ते सुरक्षा आणि अपघातांसाठी सरकारच्या प्राथमिकतेवरही भाष्य केले. 2024 मध्ये रस्ते अपघातांमध्ये 1 लाख 80 हजार लोकांनी जीव गमावला असून, त्यात 30 हजार मृत्यू हेल्मेट न घालल्याने झाले आहेत. तसेच, 18 ते 34 वयोगटातील 66 टक्के अपघात झाल्याची माहिती दिली.

शाळा आणि कॉलेजांच्या प्रवेश व बाहेर पडण्याच्या सुविधांमुळे 10 हजार मुलांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे रिक्षा आणि मिनीबससाठी कडक नियम लागू केले आहेत. नितीन गडकरी यांनी सर्वांना एकत्र येऊन रस्ते सुरक्षा वाढवण्याच्या प्रयत्नांना अधिक गती देण्याची आवश्यकता व्यक्त केली.