राहुल गांधींवरील कारवाई म्हणजे आशेचा किरण; असे का म्हणले शशी थरुर?

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसकडून संकल्प सत्याग्रहाचे आंदोलन करण्यात येत आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी, राहुल गांधी यांना न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली २ वर्षांची शिक्षा म्हणजे आशेचा किरण असल्याचे म्हटले आहे.

शशी थरुर म्हणाले की, मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची झालेली शिक्षा हा आशेचा किरण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची अभूतपूर्व एकजूट झाली आहे. आम्ही प्रादेशिक पक्षांना प्रत्येक राज्यात काँग्रेसचा एक प्रतिस्पर्धी मानत आलो. मात्र, या परिस्थितीत ते सर्व पक्ष आमच्या बाजूने आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यापूर्वी कधीही काँग्रेससोबत नव्हते, मात्र आता ते आमच्यासोबत आहेत, असे शशी थरुर यांनी नमूद केले.

शशी थरूर पुढे म्हणाले की, विरोधकांची ही एकजूट भाजपविरोधात आतापर्यंतची सर्वांत मोठी शक्ती म्हणून समोर आली आहे. हा भाजपच्या कृतीचा निषेध आहे. राहुल गांधींवरील आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. कारण ललित मोदी किंवा नीरव मोदी दोघेही पळून गेले आहेत. परदेशात ते चैनीचे जीवन जगत आहेत. तो मागासवर्गीय आहेत आणि हा ओबीसी समाजावर हल्ला आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असे शशी थरुर यांनी सांगितले.