मुंबई : धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल करणाऱ्या, माता-भगिनींची अब्रू लुटणाऱ्या, मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या क्रूर शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल, मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते . त्यानंतर आज, बुधवारी अखेर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना निलंबित करण्यात आलं आहे.
काय म्हणाले होते अबू आझमी?
औरंगजेबाचा इतिहास चुकीचा दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची स्थापना केली, औरंगजेबाचा सैनिक हा बनारसमधल्या एका तरुणीशी बळजबरी करत होता, तिला लग्न करण्याची जबरदस्ती करत होता. तेव्हा औरंगजेबाने दोन हत्तींमध्ये बांधून त्या सैनिकाची हत्या केली. तेथील पंडितांनी औरंगजेबासाठी मस्जिद बांधून दिली, असं अबू आझमी यांनी सांगितलं होतं .
तसेच अबू आझमी यांना तुम्ही औरंगजेबाला क्रूर शासक मानता का?’ असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही, औरंगजेब हा उत्तम शासक होता. तेव्हाची लढाई राजकीय होती. तेव्हाची लढाई हिंदू-मुसलमान अशी लढाई नव्हती’ असं अबू आझमी यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच. भाजपा आमदार योगेश सागर यांनी अबू आझमी यांच्या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर भाजपाचेआमदार महेश लांडगे यांनीदेखील जोदार हल्ला चढवला. विधानसभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी पक्षाने चांगलाच गदारोळ घालण्यास सुरुवात केली.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी अबू आझमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली, तर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी, ज्या औरंगजेबाने हदूंचे धर्मांतर केले, मंदिरे तोडली, महिलांना बाटवले, त्याचे गुणगान गाणाऱ्या माणसाला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. हे कायद्याचे सभागृह आहे. आझमींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. यादरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळामुळे सुरुवातीला सभागृहाचे कामकाज विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरांनी तहकूब केले होते. त्यानंतर आज, बुधवारी अखेर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना निलंबित करण्यात आलं आहे.
त्यामुळे अबू आझमी यांना आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाही. अधिवेशन कालावधी संपेपर्यंत अबू आझमींवर विधानसभेच्या इमारतीच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.