Actor Kabir Bedi : ‘तू तुला हवं ते कर’, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Actor Kabir Bedi : बॉलिवूडमधील कलाकारांचं आयुष्य हे ‘ओपन बुक’ असतं. सोशल मीडियामुळे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी उघड होतात. तसेच, सेलिब्रिटी विविध मुलाखतींमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलताना दिसतात. चाहत्यांनाही आपल्या लाडक्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशाच एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत ‘ओपन मॅरेज’ केल्याची माहिती दिली आणि हे टिकवणं किती कठीण गेलं, यावर प्रकाश टाकला.

पत्नी प्रोतिमा बेदीसोबत ओपन मॅरेज

कबीर बेदी हे आपल्या अनोख्या कारकिर्दीबरोबरच खूप चढ-उतार असणाऱ्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या पहिल्या पत्नी प्रोतिमा बेदी यांच्यासोबतच्या ‘ओपन मॅरेज’बद्दल भाष्य केलं. प्रोतिमा या प्रसिद्ध ओडिशी नृत्यांगना होत्या. त्यांच्या नात्यात प्रेम होतं, पण त्याचसोबत अनेक आव्हानं आणि अपारंपरिक निर्णयही होते.

कबीर बेदी म्हणाले, “आमच्या मुलांमुळे आम्ही एकत्र होतो. आम्हाला वाटलं, जर एकत्र राहायचं असेल तर ते मुलांसाठी असावं. म्हणून आम्ही ओपन मॅरेजचा निर्णय घेतला. आम्ही परस्पर संमतीने ठरवलं होतं की, जर तिला बाहेर प्रेमसंबंध ठेवायचे असतील आणि मलाही तसेच नाते टिकवायचं असेल, तर आम्ही एकमेकांना त्यासाठी परवानगी देऊ. ‘तू तुला हवं ते कर, मी मला हवं ते करेन’ असा आमचा विचार होता. पण हे अपेक्षेप्रमाणे झालं नाही. ओपन मॅरेज टिकवणं खूप कठीण होतं.”

भावनात्मक गुंतवणूक आणि नात्यात आलेले ताण

कबीर बेदी यांनी स्पष्ट सांगितलं की, जरी ओपन मॅरेज ही संकल्पना ऐकायला आधुनिक वाटत असली तरी ती सहजपणे निभावणं सोपं नसतं. त्यांनी सांगितलं, “परस्पर संमती असूनही खुले नातेसंबंध अनेकदा अपयशी ठरतात. कारण कितीही ठरवलं तरी, भावना कुठेतरी गुंतलेल्या असतात. त्यामुळे राग, असुरक्षितता आणि भांडणं येतातच.” त्यांनी पुढे सांगितलं की, ओपन मॅरेजमुळे त्यांच्या वैवाहिक नात्यात मोठे तणाव आले आणि अखेरीस त्यांचं लग्न तुटलं.

घटस्फोटानंतरही पालक म्हणून जबाबदारी पूर्ण

कबीर बेदी आणि प्रोतिमा बेदी यांचा घटस्फोट झाला, पण त्यांनी त्यांच्या मुलांवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. ते म्हणाले, “मी तिला माझं घर आणि पाठिंबा दोन्ही दिलं. आम्ही आयुष्यभर चांगले मित्र राहिलो. आम्हाला मुलांना जाणवून द्यायचं होतं की, जरी पालक एकत्र राहत नसले तरी ते आपले पालक आहेत.”

त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना त्यांचा हा निर्णय धक्कादायक वाटला, तर काहींनी त्यांच्या प्रामाणिक कबुलीजबाबाचं कौतुक केलं आहे. कबीर बेदी यांच्या या उघडपणे दिलेल्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा ओपन मॅरेज ही संकल्पना चर्चेत आली आहे.