तरुण भारत लाईव्ह ।९ मार्च २०२३। बॉलीवूडमधून एक दुःखद बातमी समोर येतेय. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते सतिश कौशिक यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या अकस्मात निधनाने सर्वांना मोठा धक्का बसलाय.
सूत्रानुसार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता सतिश कौशिक यांचं आज पहाटे निधन झालं. ते 66 वर्षाचे होते. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते आणि अनेक सिनेमांचे निर्मातेही होते. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956मध्ये झाला. हरियाणाच्या महेंद्रगड येथे त्यांचा जन्म झाला होता. सतिश कौशिक यांनी आपल्या करीअरची सुरुवात 1983मध्ये आलेल्या जाने भी दो यारो या सिनेमातून केली होती. त्यानंतर त्यांनी 100हून अधिक सिनेमात काम केलं. 1993मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर त्यांनी डझनभर सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी अनेक सिनेमांचीही निर्मिती केली. सतीश कौशिक यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका केल्या. मात्र, त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. त्यांच्या विनोदी भूमिकांना तोड नव्हती. सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. अभिनेता गोविंदासोबतचा त्यांचा कॉमेडीचा टायमिंग अफलातून असायचा. त्यांच्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहायच्या.