अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तरुण भारत लाईव्ह । १३ एप्रिल २०२३। मराठी चित्रपटसृष्टीमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासू त्या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षापासून त्या पोटाच्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.  उत्तरा बावकर यांनी पाच दशके सिनेसृष्टीत काम केलं आहे. गोविंद निहलानी यांच्या ‘तमस’ या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांना एका पेक्षा एक चांगल्या सिनेमांत काम केलं आहे. मृणाल सेनच्या ‘एक दिन अचानक’,’उत्तरायण’,’रुक्मावती की हवेली’,’द बर्निंग सीझन’,’दोघी’,ठक्षक’ आणि ‘सरदारी बेगम’ सारख्या अनेक चांगल्या सिनेमांत उत्तरा यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

‘एक दिन अचानक’ या सिनेमातील भूमिकेसाठी उत्तरा बावकर यांना ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ या कॅटेगरीमधील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच 1984 साली त्यांना संगीत नाटकासाठी अकादमी पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.

सिनेनिर्माते सुनील सुकथंकर यांच्या आठ फिचर सिनेमांत उत्तरा बावकर यांनी काम केलं आहे. तसेच सुमित्रा भावे यांच्यासोबतदेखील त्यांनी अनेक महिलांवर भाष्य करणाऱ्या सिनेमांत काम केलं आहे. उत्तरा बावकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील मंडळी शोक व्यक्त करत आहेत.

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उत्तरा बावकर यांची गणना होते. ‘उडान’ या मालिकेच्या माध्यमातून त्या घराघरांत पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. अभ्यासू आणि दर्जेदार अभिनेत्री अशी उत्तरा बावकर यांची ओळख आहे.