जळगाव : जळगाव शहरातील निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी तत्कालीन सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांना रविवारी दुपारी चाळीसगावातून अटक केली होती. सोमवारी जळगाव न्यायालयात न्या.आर.वाय.खंडारे यांच्या न्यायासनापुढे सोमवारी त्यांना हजर केले असता तब्बल अडीच तास सुनावणी चालली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने अॅड.चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर अॅड.चव्हाण यांच्यातर्फे दाखल जामीन अर्जावर आज, मंगळवारी सुनावणी होणार असून त्याकडे लक्ष लागले आहे.
चाळीसगाव केली होती अटक
चाळीसगावात खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात आलेल्या अॅड.चव्हाण यांना रविवारी दुपारी जळगावातील शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा संबंधिताचा कट असल्याचे भोईटे यांनी नमूद केल्यानंतर त्यांचा जवाबाअंती तत्कालीन सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांच्यासह अन्य पाच संशयिताची नावे वाढविण्यात आली होती.
तब्बल अडीच तास चालली सुनावणी
जळगाव न्यायालयात अॅड.प्रवीण चव्हाण यांना आणल्यानंतर त्यांच्यातर्फे अॅड.गोपाळ जळमकर यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, या गुन्ह्यात फिर्यादीत आमचे नाव नाही, दोन संशयीतांना यापूर्वीच अटकपूर्व देण्यात आला असून अॅड.चव्हाण यांचा समोरा-समोर कुठेही सहभाग नाही त्यामुळे पोलिस कोठडी देवू नये, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी सरकारी वकील अॅड.अविनाश पाटील म्हणाले की, या गुन्ह्याचा साक्षीदार तेजस मोरे याने केलेल्या स्टींगमध्ये ऑडीओ व व्हिडिओ प्राप्त झाले असून आम्हाला आवाजाचे नमूने घ्यावयाचे असल्याने पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने द्यावी. यावेळी भोईटे यांच्याकडून अॅड.मुकेश शिंपी यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अॅड.चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, जामीन अर्जावर आता मंगळवारी कामकाज होणार असल्याने अॅड.चव्हाण यांना सोमवारची रात्री न्यायालयीन कोठडीत काढावी लागणार आहे. तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड करीत आहेत.