नवी दिल्ली : हिंडेनबर्गच्या धमाक्यानंतर गौतम अदानी कमालीचे अडचणीत आले होते. अडानी समुहातील सर्वच कंपन्यांचे शेअर्स ५० टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. मात्र अदानींच्या एका निर्णयामुळे जोरदार कमबॅक करत त्यांनी केवळ अर्धा तासात ५३ हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता जगातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या ३० मध्ये परतले आहेत. सध्या ते जगातील २८ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक आहेत. काही दिवसांपूर्वी ते जगातील टॉप ३० च्या यादीतून बाहेर पडले होते.
अदानी कुटुंबाने एका दिवसापूर्वी चार कंपन्यांचे १७ कोटींहून अधिक शेअर्स विकले आणि १५,००० कोटी रुपये उभे केले. या पावलानंतर शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग चौथ्या दिवशी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. या तेजीमुळे अवघ्या ३० मिनिटांत अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे ५३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे, ज्याच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अदानी एन्टरप्राईजेसच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची तेजी दिसून आली होती. तर अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्येही मोठी तेजी दिसून आली होती. याशिवाय अदानी पॉवरच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. हा शेअर १६९.४५ रुपयांवर आला. तर अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागून शेअर ७४३.७५ रुपयांवर पोहोचला.
गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवस वाढ झाली आहे. त्याचा परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही दिसून आला आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी मोठी झेप घेतली आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांनी सुपर ३० मध्ये पुनरागमन केलं आहे. यासोबतच त्यांची एकूण संपत्ती ४५ अब्ज डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे.