संभाजीनगर : शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून, या बैठकीला सुरवात झाली आहे. दरम्यान यावेळी औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. तर, मंत्र्यांनी येऊन या मोर्चेकऱ्यांशी संवाद साधावा अन्यथा आम्ही मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेऊ अशी भूमिका जलील यांनी घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक या मोर्च्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांनी हा मोर्चा अडवला आहे.
हा मोर्चा विना परवागनगी काढण्यात आला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सरकारने ठेवीदारांचे पैसे परत करावेत, आम्हाला मंत्र्यांना भेटू द्यावे अशी मागणी खासदार जलील यांनी केली. मात्र या मोर्चावर सौम्य लाठीमार केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी मोर्चाला सुरुवातीला स्पीकरवरुन काही सूचना दिल्या. मात्र मोर्चा सुरु होता. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठकीला सुरूवात झाली असून मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारतर्फे मोठे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडत आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.