ICC Champions Trophy 2025 : टीम इंडिया दुबईत दाखल होताच आयसीसीची मोठी घोषणा, क्रिकेट चाहते खुश!

ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी टीम इंडिया दुबईत दाखल झाली आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान असले तरी सुरक्षा कारणास्तव भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार असून, 23 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला रंगणार आहे.

भारतीय संघाचे वेळापत्रक

20 फेब्रुवारी – भारत विरुद्ध बांगलादेश
23 फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान
2 मार्च – भारत विरुद्ध न्यूझीलंड

आयसीसीने 3 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतील सामन्यांसाठी तिकीट विक्रीला सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच सर्व तिकीट विकले गेले. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींना तिकीट मिळू शकले नाही. याच पार्श्वभूमीवर, आयसीसीने मोठा निर्णय घेत भारतीय संघाच्या सामन्यांसाठी अतिरिक्त तिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसीने अधिकृत घोषणेनुसार, 16 फेब्रुवारी दुपारी 1:30 पासून अतिरिक्त तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. क्रिकेटप्रेमी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तिकीट खरेदी करू शकतात. तसेच, 4 मार्चला दुबईत होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यांचे तिकीटही यावेळी उपलब्ध असतील.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार असून, शुभमन गिल उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळेल. संघात अनुभवी तसेच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्याची उत्सुकता शिगेला

23 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा या स्पर्धेतील सर्वात चर्चेचा सामना असेल. दोन्ही संघ आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने आले की क्रिकेट चाहते याची आतुरतेने वाट पाहतात. या सामन्यासाठी तिकीट काही सेकंदांतच विकले गेले होते, त्यामुळे आता आयसीसीने जाहीर केलेली अतिरिक्त तिकीट विक्री ही क्रिकेटप्रेमींसाठी मोठी संधी असणार आहे. क्रिकेट चाहते आता टीम इंडियाच्या विजयाची प्रार्थना करत असताना, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील रोमहर्षक सामने पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत.