तरुण भारत लाईव्ह । १ सप्टेंबर २०२३। भारताची महत्वकांशी सौर मोहीम लॉन्च होण्यासाठी अगदी काहीच तास उरले आहेत. शनिवारी 2 सप्टेंबर ला सकाळी 11:50 मिनिटांनी ‘आदित्य एल-1’ उपग्रह हा प्रक्षेपित करण्यात येईल. याचा काउंटडाउन आज दुपारी १२ वाजून १० मि. सुरु झाला. अशी माहिती इस्रोने एक्स पोस्ट करत दिली आहे.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोची ही पहिलीच मोहीम आहे. आदित्य नावाचा उपग्रह, पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एका लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येईल. याठिकाणाहून विना अडथळा आदित्य सूर्याचं निरीक्षण आणि अध्ययन करू शकणार आहे. कोरोनल हीटिंग, सौर वादळे, कोरोनाल मास इंजेक्शन, फ्लेअर्स पृथ्वीच्या जवळील अंतराळ हवामान, सूर्यावरील वातावरण आणि इतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आदित्य करणार आहे.
इस्रो ने याबाबत सांगितले कि, देशाच्या पहिल्याच सौर मोहिमेचं लाँचिंग थेट पाहून, तुम्हीही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊ शकता. इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर, अधिकृत यूट्यूब चॅनल, अधिकृत फेसबुक पेज आणि एक्स हँडलवर याचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तुम्ही टीव्हीवर देखील या यानाचं प्रक्षेपण पाहू शकता. डी. डी. नॅशनल या टीव्ही चॅनलवर हे लाईव्ह दाखवण्यात येईल. शनिवारी सकाळी 11.20 मिनिटांनी थेट प्रक्षेपणास सुरुवात करण्यात येईल.