Aditya L1 Launching: आदित्य एल १ अंतराळात झेपावलं

बंगळुरु: चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आदित्य-एल1 यशस्वीरित्या लाँच केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी५७ रॉकेटद्वारे आदित्य-एल १ चं लाँचिंग झालं आहे. आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-१ ला प्रक्षेपित केलं.

https://fb.watch/mOxPfotGXy/

आदित्य-L1 ला सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-XL रॉकेटने अवकाशात सोडण्यात आलं आहे. XL प्रकारची ही २५ वे उड्डाण आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड २ वरून हे प्रक्षेपण झालं. हे रॉकेट १४५.६२ फूट उंच आहे. प्रक्षेपणाच्या वेळी त्याचे वजन ३२१ टन होते. लाँचिंगच्या १२७ दिवसांनंतर आदित्य एल-१ L1 पॉईंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर तो सूर्याचा अभ्यास करेल आणि सूर्याबाबत महत्त्वाची माहिती पाठवण्यास सुरुवात करेल.

सूर्याचा कुठल्याही अडथळ्याविना अधिक जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ ही मोहीम इस्रोने हाती घेतली आहे. आदित्य एल-१ वर इस्रोने ७ उपकरणे ठेवली असून, ती सूर्याशी संबंधित अनेक रहस्ये उलगडण्याचे काम करणार आहे. सौर वादळे येण्याचे कारण काय आहे आणि सौर लहरींचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो हे देखील अभ्यासले जाणार आहे.

‘आदित्य’चा प्रवास कसा होणार?

– चांद्रयानाप्रमाणेच आदित्य यानही सुरुवातीला पृथ्वीजवळील एका कक्षेत परिभ्रमण करेल.

– त्यानंतर या यानाच्या परिभ्रमण कक्षा अधिकाधिक लंबवर्तुळाकार केल्या जातील.

– यानातील प्रणोदकाच्या साह्याने (प्रॉपल्शन मॉड्यूल) ते एल वन पॉइंटच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल.

– या टप्प्यात यान पृथ्वीची गुरुत्वीय कक्षा ओलांडून पलीकडे जाईल.