नाशिक : उद्धव ठाकरे हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत तर आदित्य ठाकरे हे नाशिक मध्ये असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा देत ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. बबनराव घोलप हे अनेक दिवसांपासून नाराज होते आणि ते ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बबनराव घोलप हे नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिले आहेत तर महायुती सरकारमध्ये ते मंत्री देखील राहिले आहेत.
काल बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आज आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते आपली दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांनी आज आपल्या शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरुन वरुन मला काढून मला अपमानित करण्यात आले आले. मी ज्यांना निष्क्रीय पदाधिकारी म्हणून काढून टाकले होते आणि नवीन पदाधिकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे, असे म्हणत बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून नाराजी व्यक्त केली आहे.
ठाकरे सेनेकडून शिर्डी लोकसभेचा शब्द मिळून देखील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना सेनेत प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी त्यांना दिली जाणार असल्याची चर्चा असल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.