…म्हणून आदित्य ठाकरे स्वत:चे हसू करुन घेतात

मुंबई : राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दावोस दौर्‍यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाला. तसेच मुख्यमंत्र्यांनी दावोस दौर्‍यात नेमके काय केले? याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचे हसे करुन घेणे योग्य नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत. आदित्य ठाकरे यांना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचे आणि स्वत:चे हसे करून घ्यायचे, हे योग्य नाही. आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे, खात्री करून घ्यावी, असा सल्लाही दीपक केसरकर यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास दावोसमध्ये होते आणि ते केवळ चार तास झोपले. ७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. त्यांना भेटायला अनेक देशांचे प्रमुख आले होते, त्यालासुद्धा हिणवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंकडून करणयात आला. यावरून महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे, याचा विचार केला पाहिजे, अशी टीका करण्यात आली.