अधिवेशनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

तरुण भारत लाईव्ह न्यूज : आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवीन मंत्र्यांची ओळख विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना करुन दिली. यानंतर राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांकडून नीट उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.