किशोरांच्या मेंदूत बदल करणारे व्यसन!

वेध

– चंद्रकांत लोहाणा

कोणतेही व्यसन माणसाला अनेक समस्यांच्या खाईत ढकलते. हा व्यसनाचा फास कधी कधी एवढा घट्ट आवळला जातो की, त्यामधून बाहेर पडण्याचे मार्ग कायमचे बंद होतात. हे माहीत असूनही आपण त्यास दूर ठेवण्यास कमी पडतो. अशीच व्यसनापायी उमलती नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेल्याने समाजात एक ज्वलंत व गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले सतत समाज माध्यमावर राहत असल्याने मुलांच्या स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होत आहे. मुले चिडचिडी झाल्याने त्यांचा अभ्यासावर या बाबीचा गंभीर परिणाम होत असल्याचे संशोधनाने सिद्ध झाले आहे. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठामधील मज्जातंतूशास्त्रज्ञांना (न्यूरो सायंटिस्ट) १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांच्या केलेल्या स्कॅनिंगमध्ये आढळून आले की, वारंवार सोशल मीडियावर फीड तपासण्याची सवय असलेल्या १२ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या मेंदूमध्ये विशिष्ट बदल आढळून आला आहे.

कालांतराने ही मुले सोशल मीडिया फीडस्वरील लाईक्स, कमेंट्स यांबाबत अतिसंवेदनशील होतात. त्यामुळे अभ्यास व इतर कामांमध्ये दिले जाणारे सातत्य आणि वेळ मन भरकटल्याने मुले देऊ शकत नाही समाज माध्यमांवर लहान-लहान रील्स पाहण्याच्या अती नादाचा हा गंभीर परिणाम आहे. देशातील सुमारे २३ कोटी वापरकर्ते फक्त इन्स्टाग्राम रील्स तयार करीत आहेत. याशिवाय यूट्यूब, फेसबुक व अन्य प्लॅटफार्मच्या वापरकर्त्यांची संख्याही अनेक कोटींच्या घरात आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या मते सोशल मीडिया हे डोपामाईनसारखे मेंदूतील फील-गुड रसायने सक्रिय करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. डोपामाईनसारखे न्यूरोकेमिकल्स डोक्यात सक्रिय झाले की, माणसामध्ये व्यसन निर्माण होते. या व्यसनाबाबत पालकवर्ग सतत तक्रार करीत असतात की, त्यांची मुले मोबाईलशिवाय राहूच शकत नाही. परंतु, पालकवर्ग आपला दोष कधीच बघत नाहीत. पालक स्वत:ही मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे खाताना, खेळताना सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांना मोबाईल हवा असतो. लहान मुलांची हीच सवय त्यांच्या जिवावर बेतणारी आहे.तंत्रज्ञानामुळे होणारे हे नुकसान माहीत असूनही बहुतांश पालक आपल्या मुलांना या व्यसनापासून परावृत्त करू शकत नाही, हे वास्तव आहे.

बालमन हे अनुकरणप्रिय असतं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे घडतं; त्याचंच ते अनुकरण करीत असतात. सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून असणाèया पालकांनीही या बाबीचा गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. बरेचसे कथित बुद्धिवादी भारतीय संस्कृतीची टिंगलटवाळी करून पाश्चिमात्य संस्कृतीचा उदोउदो करण्यात आपली धन्यता मानतात. मागील काही दशकामधील त्यांची सक्रियताही समाजाला अधोगतीकडे नेण्यास कारणीभूत ठरली आहे. ‘हे विश्वची माझे घर’ म्हणणा-या भारतीयाने कधीच जगाकडे बाजार म्हणून बघितले नाही. विश्वाच्या कल्याणाची कामना करणा-या भारतीयांमध्ये त्या प्रवृत्तीने कधी शिरकावही केला नाही परंतु, भारतीय हा मनाने भारतीय राहू नये यासाठी त्यांचा सतत आटापिटा सुरू असतो. सोशल मीडिया व टीव्हीवर होणारे आपल्या संस्कृतीचे विकृतीकरण हा त्याचाच एक भाग. फेसबुक, गुगल व अ‍ॅपलच्या माजी कर्मचा-यांच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्रामसारखी अ‍ॅप्स व्यसन लावण्यासाठीच बनवण्यात आला, असा आरोपही केला जात आहे.

आमच्या महान परंपरांना तिलांजली देत आम्हीच आमच्या मुलांच्या हातात मोबाईल सहज देतो. त्या मोबाईलवर तो काय बघतो, त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आम्हाला कधीच भासली नाही. आजची किशोरवयीन पिढी या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी आम्हीच कारणीभूत नाही का? पुस्तकांचे वाचन, मैदानी खेळ, एकत्रित कुटुंब याच्याशी असलेलं नात आम्ही कधीचंच तोडलं. पालक कामात दंग झाले. एकलकोंडी झालेली ही लहान मुले या व्यसनाच्या अधिकच आहारी गेली. आम्ही केलेली ही चूक जोपर्यंत आम्ही दुरुस्त करीत नाही, तोपर्यंत मुलं सुधारावी असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
९८८१७१७८५६