ॲड. चव्हाणांचा मुक्काम वाढला

जळगाव : शहरातील निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याप्रकरणी अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाने पोलिस कोठडी नाकारली. त्या विरोधात सरकार पक्षाने रिव्हीजन अर्ज सादर केला आहे. ॲड. चव्हाण यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. तोपर्यंत ॲड. चव्हाण यांना कारागृहातच दिवस काढावे लागणार आहेत.

अ‍ॅड. विजय पाटील यांच्या ताब्यातून संस्था मिळवण्यासाठी त्यांना पुण्यात बोलावून नंतर अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल होता. तो गुन्हा कोथरुड (पुणे) पोलिसांत वर्ग झाला आहे.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी ९ जानेवारी २०२२ ला नीलेश भोईटे यांच्या भोईटेनगरात छापा टाकला होता. हे सर्व कट कारस्थान ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ॲड. प्रवीण चव्हाण विशेष एसआयटी समक्ष उपस्थित राहिले असताना, त्यांना अटक केली होती.

कोठडीविरुद्ध रिव्हीजन
न्यायाधीश आर. वाय. खंडारे यांनी सरकार पक्षाची पोलिस कोठडीची मागणी फेटाळून ॲड. चव्हाण यांना न्यायालयीन कोठडीत रवाना केले होते. त्या विरोधात सरकार पक्षाने सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल केला आहे. न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात काम सुरू आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. गोपाल जळमकर यांचा गुरुवारी युक्तिवाद झाला. आज शुक्रवारी (ता. ३) त्यावर उर्वरित काम होणार आहे.