---Advertisement---
नंदुरबार : शहादा तालुक्यातील नारायणपूर शिवारातील विहिरीत पडलेल्या उदमांजराला चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतून बाहेर काढण्यात वन्यप्राणी संरक्षण संस्थेच्या पथकाला यश आले. परिसरातील जंगलात लागलीच उदमांजराला सोडून देण्यात आले.
नारायण शिवारात प्रसाद माळी यांच्या शेतातील विहिरीत एक प्राणी पडला असल्याची माहिती लक्ष्मण माळी यांनी वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था, नंदुरबारचे अध्यक्ष संजय वानखेडे यांना फोन केला. त्यांनी विहिरीत पडलेल्या प्राण्याचा फोटो सोशल मीडियावर देखील पाठवले. संजय वानखेडे यांनी ते फोटो पाहताच संबंधित प्राणी हा उदमांजर असल्याचे निदर्शनास आले. लागलीच वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य सहकारी तेजस मालचे, सूरज वळवी, रोहित भील, रोशन वसावे, अथर्व जाधव, दादू भोई हे वानखेडे यांच्यासोबत घटनास्थळी गेले.
विहिरीत पडलेल्या उदमांजराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाला. जवळपास चार तासांच्या प्रयत्नानंतर उदमांजरास बाहेर काढण्यात यश आले. जंगल परिसरात असल्याने त्याला पकडून न आणता तेथेच बाहेर सोडण्यात आले.
या प्राण्याबद्दल माहिती देताना संजय वानखेडे यांनी सांगितले, उदमांजर, ज्याला ‘मसन्या उद’ किंवा ‘एशियन पाम सिव्हेट’ म्हणूनही ओळखले जाते. हा एक निशाचर, मांसाहारी प्राणी आहे. हे प्राणी मुख्यत्वे जंगलात आणि झाडांवर आढळतात. उदमांजर लांब शेपटी आणि पाठीवर काळे पट्टे असलेले मातकट रंगाचा प्राणी आहे. ते फळे, मांस आणि किडे खातात. हा प्राणी जमिनीत पुरलेले प्रेत उकरून काढून खातो अशी अफवा लोकांमधे प्रचलित आहे. पण, हे सत्य नसून फक्त अफवा असल्याचेही वानखेडे यांनी स्पष्ट केले.