नवी दिल्ली : जपानचे सरकार कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला किंवा त्याच्या समकक्षीय नेत्याला स्टेट गेस्ट म्हणून आमंत्रित करते. परंतू, २०१३ मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जपानने स्टेट गेस्ट म्हणून बोलविले होते. नरेंद्र मोदींनंतर जपान सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘स्टेट गेस्ट’ म्हणून आमंत्रित केले आहे. फडणवीस २० ते २५ ऑगस्टपर्यंत जपान दौऱ्यावर असणार आहेत.
देवेंद्र फडणवीस जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट घेणार आहेत. फडणवीसांच्या दौऱ्यावेळी जपानच्या शाही महालात स्नेह भोजनाचे ही आयोजन केले जाणार आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचा एक गट फडणवीसांसोबत जपान दौऱ्यावर असणार आहे. सुनिटोमो, एनटीटी आणि सोनीसारख्या कंपन्यांसोबत गुंतवणुकीवर चर्चा केली जाणार आहे.
तसेच विरार सी लिंक, ठाणे कोस्टल रोड आणि नागपुर- गोवा एक्सप्रेस वे या प्रकल्पांसाठी जपानकडून अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पात गुंतवणूक करणाऱ्या ‘जेआसीए’च्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. सोबतच जपान- इंडिया असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील.