सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर महाविकास आघाडीत धुसफूस

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने पराभव केला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांची बाजू घेत काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. यावर प्रतिक्रीया देतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केल्याने महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेलं नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

‘राष्ट्रवादीने सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावरुन राष्ट्रवादीनेही मदत केल्याचा मोठा खुलासा केला आहे, अजित पवार एक जबाबदार व्यक्ती आहेत. तेच असं बोलत असतील तर महाविकास आघाडीची बैठक असेल तेव्हा आम्ही यावर खुलासा करु, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटाले यांनी दिली.

सत्यजीत तांबेंना अजितदादांचा सल्ला
सत्यजीत यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे. त्यांना बरीच वर्षे राज्याच्या राजकारणात काम करायचं आहे. त्यामुळे सत्यजीतने या सगळ्याचा विचार करुन निर्णय घ्यावा हे माझं मत आहे. सत्यजीतने ऐकावं नाही ऐकावं हा त्यांचा निर्णय आहे. पण, त्याचं घराणं काँग्रेसच्या विचारांशी निगडीत असल्याने आणि काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या सेलचे प्रमुख अनेक वर्षे तरुणांना एकत्र करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मधल्या दीड महिन्याच्या काळात काय झालं ते त्यांनी मनाला जास्त लावून घेऊ नये आणि त्यांनी काँग्रेससोबत राहावं, असंही अजित पवार म्हणाले.