Kiren Rijiju : चंद्र आणि सूर्य मोहिमेनंतर आता भारताची ‘ही’ मोहीम, काय आहे उद्दिष्ट?

चंद्रयान-३ आणि सूर्य मोहीम आदित्य एल-१ या भारताच्या मोठ्या अंतराळ मोहिमेनंतर आता ‘समुद्रयान’ या महासागर मोहिमेसाठी तयारी करत आहे.  या मोहिमेअंतर्गत तीन जणांना महासागराच्या ६ किमी (६००० मीटर) खोलीवर पाठवले जाणार आहे, अशी माहिती पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्स अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) दिली आहे.

किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे की, ‘समुद्रयान’ या सागरी मोहिमेसाठी ‘मत्स्या 6000’ ही पाणबुडी तयार केली जात आहे. चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी येथे ‘मत्स्या 6000’ या पाणबुडीची (सबमर्सिबल) बांधणी सुरू आहे. ‘समुद्रयान’ ही भारताची पहिली मानवयुक्त दीप महासागर मोहीम आहे. खोल समुद्रातील संसाधने आणि जैवविविधतेचा अभ्यास करणे आणि त्याचे मूल्यांकन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट्य आहे.

‘समुद्रयान’ माेहिमेच्‍या पहिल्या टप्प्याची चाचणी पुढील वर्षी 2024 च्या मार्चपर्यंत सुरू होईल; तर दुसरा टप्पा 2025 मध्ये प्रत्यक्षात येईल. 2026 पर्यंत हे संपूर्ण मोहीम फत्ते व्हायला हवी, अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. जी. ए. रामदास यांनी माध्यमांना दिली आहे.

‘ही मोहिम’ यशस्वी झाल्यास अमेरिका, चीन, रशिया, जपान आणि फ्रान्स या विकसित देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळणार आहे. मत्स्यपालन आणि जलकृषी यासोबतच समुद्रात असलेले विविध उपयुक्त वायू, पॉलिमेटेलिक, मॅगनीज, हाडड्रोथर्मल सल्फाइड आणि कोबाल्ट क्रस्ट खनिजे शोधण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे.

समुद्र हा अनेक अर्थाने खजिना असून, त्यातील अनेक गोष्टींचा अद्याप शोधही लागलेला नाही. त्यामुळे सागरी संशोधन हा भविष्यातील फार मोठा भाग असणार आहे. ऊर्जा, गोडं पाणी, जैवविविधता या सगळ्याचा अभ्यास करताना समुद्रातील संशोधन हे मूलगामी ठरणार आहे. या सगळ्यासाठी मोठी किनारपट्टी असणं हे भारताचं बलस्थान ठरणार आहे. भारताची समुद्रयान मोहीम त्यादृष्टीने महत्त्वाची ठरेल.

जमिनीखाली जशी खनिजसंपत्ती असते, तशीच संपत्ती समुद्राखालीही असते. समुद्रात खोल जाऊन या संपत्तीद्वारे ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ (Blue Economy) समर्थ करण्यासाठी भारतानं सागरी मोहीम आखलीय. समुद्रयान असं या मोहिमेचं नाव असून पुढील वर्षी ती राबवली जाणार आहे. या मोहिमेत सहा हजार मीटर खोल समुद्रात जाण्याचा मानस आहे. सहा हजार मीटर म्हणजे जवळपास सात बुर्ज खलिफा बसतील एवढं अंतर!

भारताला एकूण सात हजार 517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनार्‍यावर असलेली नऊ राज्ये आणि लहान-मोठी 1382 बेटे आहेत. या समुद्रात खोलवर सापडणारी खनिजे, वायू अशी नैसर्गिक संसाधने मिळाली तर ही ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ देशाच्या अर्थकारणाला नवी ऊर्जा देऊ शकेल. म्हणूनच या संसाधनांच्या शोधासाठी भारतानं मिशन समुद्रयान सुरू केलंय.