Manipur Clash : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, संचारबंदी लागू

Manipur Clash : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली आहे.थौबल जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी ३ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली यात ५जण जखमी झाल्याचे वृत्त इंडिया टीव्ही या वृत्त वाहिनीने दिले आहे. अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाहीये. हल्लेखोरांनी लिलोंग चिंगजाओ भागातील स्थानिक लोकांना लक्ष्य करत त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गोळीबारीच्या  घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी तीन वाहने पेटवून दिलीत. या घटनेनंतर थौबल, इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, कक्चिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मणिपूरमधील इंफाळ घाटीमध्ये राहणारे मैतेई आणि डोंगरराळ भागात राहणारे कुकी या दोन्ही समाजात जातीय हिंसाचार उफाळून आला होता.

आतापर्यंत १८० हून अधिक लोकांचा मृत्यू

मणिपूरमध्ये (Manipur) ३ मे २०२३ रोजी जातीय हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून १८० हून जास्त लोकांचा मृत्यू झालाय. तसेच शेकडो लोक जखमी झालेत. बहुसंख्य मैतेई समुदायाच्या मागणीला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये ३ मे २०२३ रोजी ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आला तेव्हा हिंसाचार झाला होता. मणिपूरच्या लोकसंख्येच्या ५३ टक्के लोकसंख्या मैतेई आहे आणि ते बहुतेक इंफाळ खोऱ्यात राहतात. आदिवासी- नागा आणि कुकी ४० टक्क्यांहून थोडे जास्त आहेत, ते डोंगराळ भागातील जिल्ह्यांमध्ये राहतात.