धक्कादायक! वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून कृषी सहाय्यकाने कार्यालयातच उचललं टोकाचं पाऊल

Chhatrapati Sambhajinagar News : सिल्लोड तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले जळगावचे रहिवासी योगेश सोनवणे यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यात त्यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सांगितले. या प्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यासह एका कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश सोनवणे हे नेहमीप्रमाणे सिल्लोड तालुका कृषी कार्यालयात हजर झाले होते. मात्र, कार्यालयात अन्य कोणीही कर्मचारी नसताना त्यांनी गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. सोनवणे यांनी आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्यांनी आपल्याला मानसिक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे स्पष्टपणे सांगितली आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एक गर्भवती, दुसरीची प्रसूती

त्यांनी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरधे आणि कृषी सहायक किशोर बोराडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत होती तसेच सुट्टीच्या दिवशीही अतिरिक्त काम दिले जात होते. या मानसिक छळामुळे त्रस्त होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत स्पष्ट झाले आहे.

पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

घटनेनंतर योगेश सोनवणे यांच्या पत्नी विमल सोनवणे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे ज्ञानेश्वर बरधे आणि किशोर बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू  आहे.

दरम्यान, या घटनेमुळे तालुका कृषी कार्यालयात मोठी खळबळ उडाली असून, शासकीय कार्यालयांमध्ये होणाऱ्या मानसिक छळाच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. योगेश सोनवणे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.