जळगाव जिल्ह्यात शेती पाण्याखाली; पिकांचे प्रचंड नुकसान

जळगाव : जोरदार वारा आणि मेघगर्जनासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यात हाहाकार उडला. काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली. जमिनीचा सुपीक थर वाहून गेला. पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

चोपडा तालुक्यातील अडावदसह परिसरात १४ रोजी पहाटे २ ते ५ च्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली. यात सुरेश बाहेती, भरत गायकवाड, शशिकांत कानडे, राजु कोळी, भगवती कासट आदींसह बहुतेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे कापुस, मका, केळी, व इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे व पुरांमुळे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना शेतात जाणे न झाल्यामुळे किती नुकसान झाले असावे या विचारांनी बळीराजा हवालदिल झाला आहे.

तसेच वडगाव बुद्रुकसह पंचक्रोशीत ढगफुटीसदृश पाऊस होऊन शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने बांध फुटले. काही ठिकाणी केळीची नवीन लागवड केलेली रोपे वाहून गेली. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने कापूस, मका यांसह इतर पिके पाण्याखाली गेल्याची स्थिती होती.  फुपनगरी आणि वडनगरी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलालगत रस्ता वाहून गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला.

 दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप
अडावदसह परिसरात दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरुच असल्याने नुकसानीचे पंचनामे होवू शकले नाहीत, अशी माहिती अडावदचे तलाठी विजेंद्र पाटील आणि वडगाव बु||चे तलाठी मुकेश सोनवणे यांनी दिली.