अहिंसादूत, वात्सल्यमूर्ती, युगपुरुष भगवान महावीर

तरुण भारत लाईव्ह । प्रो.डॉ. देवानंदा पारस सांखला । अहिंसादूत,वात्सल्यमूर्ती, मानवता धर्माचे प्रेरक – प्रवर्तक- पुरस्कर्ते, जैन दर्शन आणि जैन परंपरेचा परमोत्कर्ष, युगपुरुष, नवा इतिहास घड़वणारे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर, सर्वज्ञ, सर्वदर्शी, त्रिकालज्ञाता, भगवान महावीर यांचा आज जन्म कल्याणक दिवस,  त्यानिमीत्य सर्व प्रथम या महान विभूतीस विधीवत वंदन. हिमालयाची ऊंची-पाण्याची निर्मलता-चंद्राची शीतलता- आकाशाची विशालता-फूलाची कोमलता-पृथ्वीची क्षमाशीलता धारण करणारे असे अनोखे-अदभुत-अनन्य साधारण-अविश्वसनीय व्यक्तिमत्वधारक भ. महावीर होते. ते क्रांतिकारक-समाज सुधारक-लोकनायक-प्राणी मात्राचे हितचिंतक होते.

जगाला उपदेश देणारे, उदाहरण देणार्‍या अनेक व्यक्ति मिळतील, पण ज्यांचे संपूर्ण जीवनच एक उदाहरण आहे असे फार कमी आहेत. त्यातील भव्य दिव्य व्यक्तिमत्व भ. महावीर होत. सहस्र रश्मी दिनकराप्रमाणे त्यांचे तेज: पुंज होते. अथांग -अपार सागरा प्रमाणे गहन- गंभीर आणि अनंत अंतरिक्ष प्रमाणे विराट व्यापक व्यक्तिमत्व होते. जीवनाकडे पाहन्याचा दृष्टिकोन निरुपम सर्वकंश होता. ते तेजस्वी -ओजस्वी -तपस्वी युगदृष्टा होते. ते ज्ञानी -ध्यानी- चरित्र्यनिष्ठ होते. चिंतनशील विचाराला प्रभावी वाणीची जोड होती. मन इतके जास्त विशाल की ” अवघे विश्वची माझे घर आणि तीचे कल्याण हाच एकमेव ध्यास सतत होता.

या अशांत जगात सुख-शांति- सद्भाव- सौख्य प्रस्थापित होन्या साठी, विश्वशांतीसाठी, भ. महावीरांची अहिंसा -अपरिग्रह – अनेकांत ही सूत्रे वैज्ञानिक दृष्टिकोणातुन लक्षात घेतली पाहिजे. भ. महावीरांची अहिंसा सर्वोदय संजीवनी आहे. अहिंसा हाच चरम-परम धर्म आहे. अहिंसेच्या पूर्ण विकासाने युद्धाच्या ज्वालाचे ज्योतीमध्ये परिवर्तन होईल. मनुष्याला जगा आणि जगू द्या हा संदेश अहिंसा देते.

अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा अधिक संग्रह न करणे. सिंहाला जेव्हा भूख लागते तेव्हाच तो शिकार करतो, मात्र मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो संग्रह वर संग्रह करीत जातो. त्यामुळे सामाजिक विषमता निर्माण होते. सह अस्तित्व, जगा आणि जगू द्या, या घोष वाक्याचे मुळ अपरिग्रह तत्वात आहे.

अनेकांतवाद ही भगवान महावीरांची लाभलेली देणगी, जैन दर्शन चा प्राण आहे. अनेकांतवाद तत्वाचे पूर्णपणे आकलन झाले तर धर्माच्या,  भाषेच्या नावाने होणारे सर्व संघर्ष संपुष्टात येतील. ‘माझेच खरे’  यात तनाव-दुराग्रह आहे. तर’ माझे ही खरे आहे-तुमचेही खरे आहे’  यात समन्वय-समजूतदारपणा आहे. अहिंसेमुळे युद्धाला पूर्ण विराम मिळून शांतीचे साम्राज्य प्रस्थापित होते. अपरिग्रहचा अंगीकार केल्याने समाजवाद येवू शकतो आणि अनेकांतच्या प्रयोगामुळे आपसी संघर्षाचे विश्व मैत्रीत परिवर्तन होवू शकते.

भ.महावीरांनी मानवता धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी सत्याचे तत्व प्रतिपादित केले. सत्य उच्च नाही, नीच्च नाही. सत्याला जात नाही, लिंग नाही. सत्य हे संपूर्ण असते व सर्वत्र विराजमान असते. म्हणून वर्ण व वर्ग, वर्ज्य – त्याज्य मानून सत्याचा सर्वंकष शोध घेणे जरुरी आहे.
अनेक विचार महावीरांनी मांडले

स्री -पुरुष सर्वांना जाती-धर्म-वर्ण-वर्ग-वंश ई.चा विचार न करता जगणे, सर्व क्षेत्रात समान संधी लाभणे हा त्यांचा हक्क – अधिकार आहे. ह्यूमन राइट्स चा विचार किती तरी आधी त्यानी मांडला. सोने वितळल्यावरच आकर्षक दागिने तयार होतात, लोखंड वितळल्यावरच शस्त्र बनतात, त्याचप्रमाणे अहंकाराचा त्याग केल्यावर खरा मनुष्य तयार होतो. जेथे मी चे अस्तित्व आहे तेथे प्रेम टिकुच शकत नाही. म्हणून मनात अहंकार नसावा. मनाची रचना समजल्याशिवाय ध्यान, एकाग्रता अशक्य आहे. कारण मन हेच मनुष्याच्या बंधनाचे, मोक्षाचे कारण आहे. चंचल मनाला साधना व ज्ञानाद्वारे समजुन आध्यात्मिक उन्नती शक्य होते, असेच भगवान महावीरांचे तत्वज्ञान आहे. क्षमा, प्रेम, विश्वबंधुत्वाची जगाला आज नितांत आवश्यकता आहे. क्षमा भित्र्यांचा नव्हे, विरांचा धर्म आहे. क्रोध हा विकार आहे तर क्षमा हा विचार आहे. क्षमा म्हणजे दुर्बलता, कायरता नाही. समोरच्याला माफ करणारे व स्वत:ला साफ करणारे मौलिक अस्त्र आहे. क्षमा आहे जेथे, मुक्ति आहे तेथे. सक्षम – समर्थ असुनही जो अपराध्याबद्धल क्षमाशील बनतो तो सर्वोच्च साधक आहे. पृथ्वीवर सत्य -अहिंसा – प्रेम – मोक्ष त्या मार्गे स्व कल्याणचा मार्ग दाखवन्यासाठीच त्यांचा जन्म झाला. ते केवळ सिद्धार्थ – त्रिशलासाठी नाही तर समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी जन्मले. संपूर्ण विश्वात महावीर एकमेव होवुन गेले की ज्यांनी प्रत्येक प्राणी मात्राला परमात्मा बनण्याचा अधिकार दिला.

भ.महाविरांनी अहिंसा तत्वा बरोबरच सत्य, अचोर्य, ब्रम्हचर्य, सर्वधर्म समभाव, साम्यवाद, कर्मवाद, स्वदेशप्रेम, नारी सम्मान, ई. बाबतीत जागृती करुन समाज प्रबोधन केले. केवळ वैचारिक धूळ उड़वुन अनुयायांची परवड़ करण्यापेक्षा त्यानी प्रत्यक्ष प्रयोग आचरणात आणले, आत्मक्लेश सहन करुन सहिष्णुता शिकवली. जनतेचा राग सोसून सार्‍या मानव जातीला प्रेम करायला शिकवले. दुष्टाचा मोकाट छळ सोसुन मानवतेची सेवा करण्याचा आदर्श जगासमोर प्रस्थापित केला. ते खरोखरच महाज्ञानी, सर्वश्रेष्ठ होते.. त्यांच्यापासून प्रेरणा घेवून आदर्शमय जीवनाकडे प्रत्येकाने वाटचाल करावी..

शेवटी एक नक्की, जर विश्वातील प्रत्येकाने महावीरांची सर्व तत्वे अंगीकारली तर निश्चित सर्व चांगले दृष्टीपथास, अनुभवास येइल..
धन्य धन्य है वीर मां त्रिशला का नंदन,
जीवन का कण कण है मेहकता चंदन।
आज करे उनके मौलिक तत्वों का मंथन,
वीर प्रभू को सब का कोटी कोटी वंदन ॥