भारतीय लष्कराने बनविले AI आधारित यंत्र, लाखोंचे जीव वाचणार

नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता येत नाहीत. मात्र हे अपघात आता टळू शकतील. कारण भारतीय लष्कराने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने एक अनोखे यंत्र बनविले आहे. या यंत्राला पेटंटही मिळाला आहे. या यंत्रामुळे ज्यामुळे लाखो लोकांचा जीव वाचणार आहे.

बहुतांश अपघात हे चालकाला डुलकी लागली की होत असतात. यामध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्यूमुखी पडतात. AI आधारित यंत्र ड्रायव्हरवर लक्ष ठेवणार आहे. त्याला डुलकी लागली रे लागली की ते अलार्म वाजविणार आहे व चालकाला जागे करणार आहे. या यंत्रामुळे अपघातावर नियंत्रण मिळविण्यास फायदा होणार असल्याचा दावा लष्कराने केला आहे.

भारतीय सैन्य अधिकारी कर्नल कुलदीप यादव यांनी हे उपकरण विकसित केले आहे. 2021 मध्येच त्याच्या पेटंटसाठी अर्ज केला होता, जो आता प्रमाणित झाला आहे. भारतीय लष्कराने सांगितले की त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अपघात प्रतिबंधक प्रणालीचे पेटंट मिळाले आहे. लष्कराने हे ट्विट करून कळविले आहे. अपघात प्रतिबंधक उपकरण लष्कराच्या संशोधन आणि विकास (R&D) घटकाने विकसित केले आहे, असे आर्मीने म्हटले आहे.

वाहनाच्या डॅशबोर्डवर बसवलेले सेन्सर-सुसज्ज उपकरण ड्रायव्हरच्या डोळ्यांवर लक्ष ठेवते आणि जेव्हा तो डोळे बंद करतो तेव्हा त्याला सतर्क करते. यासाठी काही ठराविक वेळ देण्यात आली आहे. या उपकरणाची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. आता चाचणीनंतर भारतीय लष्कराच्या सर्व वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवली जात आहे.