राष्ट्रवादीच्या आमदारासाठी अजितदादांनी लावला थेट नितिन गडकरींना फोन; वाचा सविस्तर

अहमदनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रिय मंत्री नितिन गडकरी व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे स्पष्टवक्ते म्हणून परिचित आहे. या दोन्ही नेत्यांचे अन्य पक्षातील नेत्यांशीही सलोख्याचे संबंध आहेत. याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. राष्ट्रीय महामार्गांच्या दुरूस्तीच्या मागणीवरुन राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. यावेळी अजित पवार यांनी उपोषण स्थळावरुन थेट नितिन गडकरी यांना फोन लावून संवाद साधला. यावेळी गडकरी यांनी लंके यांच्याशीही फोनवरुन चर्चा केली. गडकरींकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी आपलं उपोषण मागे घेतले.

अहमदनगर-पाथर्डी, अहमदनगर ते कोपरगाव आणि अहमदनगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली होती. यासंबंधी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने मागील चार दिवसांपासून ते उपोषण करत होते. त्यांच्या समनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता रोकोही केला होता. हा विषय चिघळण्याची चिन्हे असतांना नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आलेल्या आश्वासनानंतर निलेश लंके यांनी उपोषण मागे घेतलं आहे.

मात्र या प्रकरानंतर सर्वाधिक चर्चा होतेय ती गडकरी व अजित पवार यांची दोघांचे पक्ष वेगवेगळे, मात्र एका नेत्याने स्वत:च्या पक्षातील नेत्यासाठी थेट केेंद्रिय मंत्र्याकडे आपला शब्द खर्च केला. दुसरीकडे गडकरी यांनीही पक्षिय राजकारण मध्ये न आणता, विकासात्मक दृष्ट्या योग्य असलेली मागणी तातडीने मान्य करुन पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्या.