बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा… अजितदादांना एवढ्या आमदारांचा पाठिंबा?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी खूप महत्वाचा दिवस असणार आहे. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची मुंबईत बैठक पार पडणार आहे. कोणत्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार यावरून संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीपूर्वीच बहुमताचा आकडा समोर आला आहे. अजित पवार यांना 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांसोबत 44 आमदार असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे. 44 आमदारांमध्ये विधानसभेचे 42 आणि विधान परिषदेचे 2 आमदार आहेत. या 44 आमदारांनी अजित पवार यांना प्रतिज्ञापत्र देऊन आपले समर्थन दिले आहे. शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. मात्र जरी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून असा दावा करण्यात आला असला तरी बहुमत नेमके कोणाच्या बाजूने आहे हे दुपारी पार पडणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.