मुंबई : प्रत्येकाचा एक काळ असतो, असे वक्तव्य करत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा सुकाणू कोणाच्या हाती असेल हे एका वाक्यात स्पष्ट केले. कालाय तस्मै नमः असे म्हणतात. काळानुसार बदल होतात. हे बदल स्वीकारावे लागतात. नेमका हाच धागा पकडून अजित पवार यांनी राज्यातील राजकारणाचा पट उलगडून दाखवला. प्रत्येक नेत्याचा एक करिष्मा असतो, असे सांगायला ही ते विसरले नाहीत. राजकारण कोणत्या दिशेने गेले. नेते कसे वागले आणि राजकारणाने कशी कूस बदलली याचा उलगडा त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला केला. MET मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात शक्ती प्रदर्शन झाले. त्यांच्या खेम्यात किती आमदार आले, हे जनतेने पाहिले.
ही वेळ राष्ट्रवादीवर का आली
भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी सर्वांच्या मनात सलत असलेला प्रश्न ऐरणीवर घेतला. सध्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. ही वेळ राष्ट्रवादीवर का आली या प्रश्नालाच त्यांनी हात घातला. मी राजकीय जीवनात काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो आहे. घडलो आहे. याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. साहेब श्रद्धास्थान आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या. देश पातळीवर आणि राज्य पातळीवर राजकारण सुरू आहे. एखादा पक्ष कशासाठी स्थापन करत असतो. लोकांच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी. संविधानाचा आदर करण्यासाठी. सर्व समाज असेल त्यांच्या विकासासाठी आपण काम करत असतो. सर्व लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं असतं त्यासाठी आपण काम करत असतो, असे सांगत त्यांनी वेगळी चूल मांडण्या मागची मनोभूमिकाच जणू जाहीर केली.
काळाचा महिमा उलगडला
भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दचा अजित पवार यांनी उल्लेख केला. 1962 साली शरद पवार राजकारणात आले. 1967 साली त्यांना उमेदवारी मिळाली. पुढे ते 1972 साली मंत्री झाले. पुढे वसंतदादा पाटील यांचं सरकार बाजूला सारुन मुख्यमंत्री झाले. त्यावेळी ते 38 वर्षांचे होते. त्यानंतर पुलोदचा प्रयोग झाला. प्रत्येक राजकीय घडामोडींचा, त्यामागील कार्यकारणभाव अजित पवार यांनी उलगडला. काळ आणि राजकारण कसे बदलत गेले याची माहिती दिली.
इतिहास बघितला तर करिष्मा असलेले नेतृत्व लागतं, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. इंदिरा गांधी यांनी करिष्म्यावर एकहाती सत्ता आणली. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी जनता पक्षाचं सरकार आणलं. पण आज जनता पक्ष कुठे आहे हे शोधावं लागतं, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. करिष्माई नेता लागत असतो, असे त्यांनी सूचक वक्तव्य केले.
अजित पवार यांनी आज 5 जुलै रोजी केलेल्या भाषणात जोरदार वक्तव्य केले. प्रत्येकाचा एक काळ असतो, हे त्यांनी शरद पवार यांना सूचवले आहे. आता काळ तरुणाईचा, पुढील पिढीचा आहे. त्यांच्या हातात सत्तेची, पक्षाची सूत्रं देऊन मोकळे व्हावे, असे तर अजित पवार यांना सूचवायचे नाही ना. काळानुसार, राजकारण बदलवता आले पाहिजे. काळासोबत धावता आलं पाहिजे. आलेल्या संधीचं सोनं करता आले पाहिजे, अशा अनेक मुद्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे नव नेतृत्वाला संधी देण्याची साद घातली.