मुंबई : तुम्ही आता रिटायर्ड व्हा, आता तुम्ही आराम करा असं कळकळीचं आवाहन अजित पवार यांनी शरद पवार यांना केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्या पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार किती आणि शरद पवार यांना पाठिंबा देणारे आमदार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. त्यासाठी आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी महत्वाची बैठक आयोजित केली त्यावेळी अध्यस्थानावरून ते बोलत होते.
अजित पवार भाषणात पुढे म्हणाले की”कॉर्पोरेट, सरकारमध्ये निवृत्तीचं वय ५८ आहे, भाजपमध्ये ७५ आहे, अडवाणी, मुरली मनोहर जोशींकडे बघा, इथे तुम्ही ८२ झालं ८३ झालं तुम्ही कधी होणार निवृत्त? करा की आराम, मार्गदर्शन करा आम्हाला, तुम्ही शतायुषी व्हा पण आम्हाला कधी संधी मिळणार? निवृत्त व्हायचं नव्हतं तर राजीनामा का दिला? हा कसला हट्टं आहे? का आणि कोणासाठी चाललंय!! आम्हाला सरकार चालवणं येतं नाही का? आमदारांच्या पत्नीला फोन करून भावनिक आवाहन केलं जातं, आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे माझी??
कुणी काहीही म्हणा आज काश्मीरपासून कन्याकुमारींपर्यंत मोदींना समर्थन आहे, त्यांची जादू आहे, लोक त्यांना मत देतात, जर आज देशामध्ये त्यांच्याशिवाय पर्याय नसेल तर त्यांना पाठिंबा देण्याला काय हरकत आहे? कशाला कडबोळं बांधायचं आहे विरोधीपक्षांचं? असं कडबोळं आधीही प्रयोग झाले तरीही चालले नाही. अनेक बैठकांमध्ये वरिष्ठांनी (पवारांनी) सांगितलं की २०२४ मध्येही मोदीच पंतप्रधान होणार, मला राष्ट्रवादी पुढे न्यायची आहे, पक्ष आणि चिन्हासकट!! माझी माझ्या दैवताला विनंती आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, उद्या जर त्यांनी दौरा सुरु केला, सभा घेतली तर मला ही घ्यावी लागेल मी गप्प बसलो तर लोकांना वाटेल माझ्यात खोट आहे” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.