देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही की कितीही मुलं जन्माला घाला, अजित पवारांची स्पष्ट भुमिका

कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी’ या विचार शिबिरात राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फॅमिली प्लॅनिंग व समान नागरी कायद्यावर परखड भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील सर्वच राजकीय पक्षांना एक आवाहन देखील केलं.

अजित पवार म्हणाले की, आपल्याला पुढच्या पिढीसाठी एक विचार करावा लागेल, आता काहीही करून एक किंवा दोन आपत्त्यांवर थांबायला हवे. त्यासाठी कायदा करावा लागला तरी तो पंतप्रधान मोदींनी करावा. कुठल्याही जातीने, पंथाने, धर्माने कुणी काही सांगितलेले नाही, देवाने काही सांगितले नाही अल्लाहने काही सांगितले नाही की, कितीही मुलं जन्माला घाला म्हणून. एक किंवा दोन आपत्यांवर आपण थांबलो नाही, तर देशात अशी परिस्थिती निर्माण होईल, की पाणीही प्यायला राहणार नाही. घरांची व्यवस्था करता येणार नाही, असे रोखठोक मत त्यांनी मांडले.

याचवेळी समान नागरी कायद्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “समान नागरिकायद्यासंदर्भात एक गैसरमज आहे. माझ्या मागासवर्गीय, आदिवासींमध्ये, भटक्यांच्या मध्ये आहे. खरे तर यात आरक्षणाला कुठेही धक्का नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, समान नागरिकायदा म्हणजे, या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला कायदा सारखाच. आरक्षण वेगळं. ते तुमचं राहणारच. ते आरक्षण कुणीही काढू शकणार नाही.”

समाननागरी कायद्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांना काही तरी भूमिका घ्यावी लागेल. त्यात काही शंका, कुशंका त्रुटी वाटल्यास त्यावर चर्चा करू. चर्चेतून नेहमी चांगलेच बाहेर येते. पण पुढच्या पिढीचे काय भवितव्य आहे. यासंदर्भातही आताच्याच राज्यकर्त्यांनीच विचार करायला हवा, असंही त्यांनी नमूद केलं.