---Advertisement---

अवकाळी पाऊस : शेतकर्‍यांसाठी अजित पवारांनी केली मोठी मागणी

---Advertisement---

मुंबई : राज्यात विविध भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा, लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी
शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत, अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत मिळालीच पाहिजे, जाहीर करा, जाहीर करा शेतकर्‍यांना भरपाई जाहीर करा, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे, मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी, नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा सहावा दिवस असून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment