पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? हा वाद आता थेट निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवार गटानं पक्षावर व निवडणूक चिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदही आमच्याकडे असल्याची भूमिका अजित पवार गटानं घेतली आहे. त्याचवेळी समोरून शरद पवार यांनी आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात असताना आता खुद्द अजित पवारांनीच आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं विधान केलं आहे.
जयंत पाटील पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, असं विधान शरद पवारांनी करत यासंदर्भातला निर्णय आमच्याकडून होईल”, अशा आशयाचं विधान केलं होतं. एकीकडे शरद पवारांनी भूमिका स्पष्टपणे मांडली असताना दुसरीकडे सुनील तटकरे अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची भूमिका मांडताना दिसले. “निवडणूक आयोगाकडून आमच्या बाजूने निर्णय लागेल असा आम्हाला विश्वास आहे. अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे आम्ही याचिकेत सांगितलं आहे. त्यामुळे त्यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल”, असं सुनील तटकरे म्हणाले.
दरम्यान, आत्तापर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नव्हती. मात्र आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर वक्तव्य केलं आहे. सुनील तटकरेंनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी अजित पवारांची प्रतिक्रिया विचारली असता त्यावर “मला माझ्या सहकाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळे मी आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.