तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार, या चर्चेने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता अजित पवार यांच्यासोबत ५३ पैकी ४० आमदार असल्याचं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांत म्हटले आहे. यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या भुमिकेमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. २०१९ रोजी अजित पवारांनी पहाटे राजभवनभर जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तेव्हाही असे काही घडेल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्ते, पदाधिकार्यांना वाटले नव्हते. तसेच यापूर्वी त्यांनी अचानक अनेक राजकीय धक्के दिलेले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांच्या भाजपबरोबर जाण्याच्या सुरू असलेल्या चर्चेत तथ्य असावे, असा संशय राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांमध्ये आहे. दरम्यान, अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे देखील नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार आणि सुप्रिया पवार म्हणतात…
या सगळ्या घडामोडींवर आणि अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एवढंच नाही तर शरद पवार यांनी जेव्हा अदाणींच्या संदर्भात जी भूमिका मांडली त्यानंतर दुसर्याच दिवशी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. आता ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजितदादांकडे आहे हे वृत्त समोर आल्यानंतरही शरद पवार यांनी या सगळ्याबाबत सूचक मौन बाळगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी १५ दिवसांत दोन मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. यामधील एक दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरुय : पृथ्वीराज चव्हाण
दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद लवकर मिळावं. पण भाजपासोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.