छत्रपती संभाजी महाराजांबाबतच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार ठाम, म्हणाले…

मुंबई : द्वेशाचं राजकारण करणं मला मान्य नाही. छत्रपती संभाजी महाराजांबाबत मी सभागृहात केलेल्या विधानावर मी ठाम आहे. छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणं अधिक संयुक्तिक आहे. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचं संरक्षण केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षक म्हणणं त्यांना न्याय देणार आहे. मी छत्रपती संभाजी महाराजांबाबत काही चुकीचं बोललो, असं मला वाटत नाही. मी माझी भूमिका मांडली, ज्यांना योग्य वाटेल त्यांनी ती स्वीकारावी, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणण्याची आवश्यकता नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केले होते. त्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. राज्यातील सत्ताधारी शिंदेगट आणि भाजपा अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक झाला होता. मात्र गेले काही दिवस या वादावर शांत असलेल्या अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येत आपण छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाबाबत आजही ठाम असल्याचे सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले की, स्वराज्यरक्षणामध्ये सर्व गोष्टी येतात. मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. वादग्रस्त विधान तर राज्यपाल, भाजपाचे नेते आणि मंत्र्यांनी केलं होतं. त्यांच्यावर कधी कारवाई करणार? मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे, मला विरोधी पक्षनेतेपद हे भाजपाने दिलेलं नाही. त्यामुळे माझा राजीनामा मागण्याचा अधिका भाजपाला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. जेव्हा मी सभागृहात बोलत होतो, तेव्हा सर्वजण शांत होते. त्यानंतर जे घडले ते घडवणारा मास्टरमाईंड तिथे नव्हता. माझ्याविरोधात आंदोलन करण्याचे आदेश दिले गेले, असा दावाही अजित पवार यांनी केला. तसेच मी काही इतिहास संशोधक नाही. मी जे काही वाचलं त्यावरून माझं जे मत बनलं ते मी मांडलं, असंही अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही
मला एका गोष्टीची गंमत वाटते की मी आत्तापर्यंत कुठल्याही महापुरूषांच्या विरोधात चुकीचं काहीही बोललो नाही. त्याआधी आम्ही जो महामोर्चा काढला त्यावेळी राज्यपालांनी महापुरूषांविषयी बेताल वक्तव्यं केली होती. मला एक कळत नाही भाजपाने माझ्या विरोधात आंदोलन करा सांगितलं. राजीनामा मागा. मी सांगू इच्छितो की माझं पद हे मला भाजपाने दिलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने दिलं. संभाजीराजेंविषयी मी काहीही चुकीचं बोललो नव्हतो. मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं, त्यांच्या नेत्यांनी केलं. तसंच शरद पवार यांनी जे सांगितलं आहे त्या मताशीही मी सहमत आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

राज्यपाल, मंत्री महोदय, भाजपाचे आमदार, भाजपाचे नेते या सगळ्यांनी मला विरोधी पक्षनेते पद दिलेलं नाही. तसंच वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केली आहेत. माझ्या विरोधात आंदोलनं करणार्‍यांनी जरा अंतर्मनाला विचारावं मला शिकवू नका असाही टोला भाजपाला अजित पवार यांनी लगावला. असा कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यामध्ये काही अपराधिक भाव होते असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी इतिहासातलं काहीही चुकीचं मत मांडलेलं नाही. अमोल कोल्हे यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. इतिहासकारांनीही भूमिका मांडली आहे. उगाच राजकारण करण्यासाठी कुणीही या गोष्टीचा वापर करू नये असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.