मुंबई : जी गारपीट झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र संपामुळे पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडसावले. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकर्यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.
राज्यात शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान तुम्हाला हक्क, अधिकार मागण्या मागायचा आहे परंतु माणुसकीची भावना ठेवून पंचनामे करावेत असे आवाहन अजित पवार यांनी कर्मचार्यांना केले. गारपीठीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. फळबांगांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आले आहेत. आणि सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले.
गारपीठीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाला आहे. संप सुरू आहे. पंचनामे करायला कोण नाही. महसुल नियमानुसार आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी. आणि वाटप सुरू करावे. आजच्या आज उपाययोजना करावी. तात्काळ निर्णय करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केली.