मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्लीला रवाना झाले आहेत. खातेवाटपाचा तिढा सुटता सुटताना दिसत नाहीय. गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे.
असं असताना खातेवाटपावर मार्ग निघत नाहीय. त्यामुळे आता भाजपच्या दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर याबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर दिल्लीत आता खलबतं होण्याची शक्यता आहे.
अजित पवार दिल्लीला रवाना झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिवसेनेची असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये अमित शाह यांना यश मिळतं का? ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.